पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५४
भारतीय लोकसत्ता

ध्यानीं येईल. देशांतील बहुसंख्य जनता आपल्या हक्कांच्या जाणीवेनें जागृत झाली तरच लोकशाहीचा उद्भव होतो व ती यशस्वी होते. सत्याग्रहाचीं तत्त्वें कितीहि थोर असलीं तरी ती पूर्णपणे अंगी मुरलेले लोक नर अगदी अल्पसंख्य असले तर त्यांचा राष्ट्रीय स्वातंत्र्याला किंवा लोकशाहीच्या प्रस्थापनेला कसलाच उपयोग होणार नाहीं. पण त्यांनीच आपल्या सामर्थ्यांचा उपयोग करून लोकांच्या ठायीं प्रतीकार भावना निर्माण केली, व बहुसंख्य जनतेत लढा निर्माण केला तर त्यायोगे लोकजागृतीच्या ज्या प्रचंड लाटा निर्माण होतील त्यांनी मात्र राष्ट्राची अभूतपूर्व प्रगति होईल यांत शंका नाहीं. महात्माजींनीं या भरतभूमित हें कार्य केले व करविलें. त्यांना जितक्या उंच पातळीवर जनतेस न्यावयाचे होते तितक्या उंचीवर ती गेली नाहीं हें खरे. पण त्यामुळे त्यांच्या लढ्याचे महत्त्व रतिमात्र कमी होत नाहीं. तीस कोटी लोकांना जागृत करणे हें यश एक आयुर्मान सफल करण्यास अगदीं पुरेसे आहे.
 नेताजी सुभाषचंद्र बोस हे सशस्त्र लष्करी क्रान्तीचे पुरस्कर्ते होते आणि शेवटी त्यांनीं तसा प्रचंड प्रयत्नहि केला होता, हे आतां सर्वश्रुत आहे. पण असे असले तरी या सशस्त्र क्रान्तींची पूर्व तयारी महात्माजींनी केलेल्या निःशस्त्र प्रतिकारामुळेच झाली होती, हें त्यांनी सिंगापूराहून केलेल्या भाषणांत प्रांजळपणे मान्य केलें आहे. 'गेल्या वीस वर्षांत हिंदुस्थानांत जी जागृति झाली आहे ती महात्माजींनी भारतीयांच्या हातीं जें अभिनव शस्त्र दिले आहे त्यामुळे झाली आहे या म्हणण्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं, भारतीयांच्या ठायीं जो स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत झाला आहे त्याचे श्रेय गांधीजींनाच आहे.' असे २ ऑक्टोबर १९४३ च्या भाषणांत त्यांनी निःसंदिग्ध उद्गार काढले आहेत. पण हे सांगून वर ते म्हणतात, 'हिंदुस्थानांत महात्माजींनीं सत्याग्रहाचा लढा सुरू केला तो सशस्त्र लढा शक्य नव्हता म्हणून. आतां काळ बदलला आहे. आतां भारतीयांना शस्त्र उपसणे शक्य आहे. आतां स्वातंत्र्यसेना सिद्ध झाली आहे याचा मला मोठा अभिमान वाटतो. हिंदुस्थानांत सध्या भारतीयांनीं जे प्रयत्न चालविले आहेत त्यांनीं स्वातंत्र्य मिळाले तर सर्वांत जास्त आनंद मलाच होईल. पण तशी मुळींच आशा वाटत नसल्यामुळे सशस्त्र क्रान्ति अपरिहार्य आहे