पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५१
जनताजागृति

साम्राज्य हें आतां एक दिवस कोसळून पडण्याचा संभव आहे अशी आशा जाणत्या भारतीयांच्या मनांत त्या दिवशीं निर्माण झाली.
 तीस सालच्या लढ्यानंतरचा मोठा लढा म्हणजे ४२ सालचा होय. या लढ्याचे नेतृत्व काँग्रेसने मुंबईच्या ठरावानें जरी महात्माजींकडे दिलें होतें, तरी तो लढा त्यांच्या पद्धतीनें व मार्गाने झाला नाहीं. पहिल्यापासूनच लढ्याची सूत्रे सोशॅलिस्टांनी हाती घेतली व अनत्याचारावर त्यांचा विश्वास नसल्यामुळे त्यांनीं त्याला घातपाताचे व कांहींसे दहशतवादाचे रूप दिले. हें आंदोलन फार प्रचंड झाले हे खरे; पण महात्माजींच्या कायदेभंग- करबंदीच्या पद्धतीने ३० सालच्या धर्तीवर हा संग्राम झाला असता तर त्याचे स्वरूप जास्त प्रभावी झालें असतें. तीस सालीं लाख सव्वा लाख लोक तुरुंगांत गेले होते व त्याच्या दसपट लोकांनी कायदेभंग केला होता. ही संख्या आतां ४०/५० लाखांवर जाऊन हिंदुस्थानांतच लष्करांत क्रान्ति घडून आली असती. त्या वेळीं एक गढवाल झालें. आतां सर्वत्र गढवालच झाले असते; पण तसे फारसे घडलें नाहीं. तरी सुदैव असे कीं, ही उणीव नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भरून काढली. ४२ चे आंदोलन यशस्वी झाले याचे कारण सुभाषचंद्रांची ही उठावणी हेंच होय. लोकजागृतीच्या लाटा लष्करापर्यंत येऊन भिडल्या हें ब्रिटिशांनी या घटनेमुळे जाणले आणि ते शहाणे असल्यामुळे त्यांनी येथून काढता पाय घेण्याचे ठरविले.

नेताजी

 महात्माजींचा सत्याग्रह व सुभाषचंद्राची लष्करी उठावणी यांचा अन्योन्य संबंध आपण नीट ध्यानांत घेतला पाहिजे. तरच सत्याग्रहाचीं आंदोलने हीं लोकसत्तेस कोणत्या दृष्टीनें उपकारक झाली व त्याअन्वयें भावी काळांत आपणांस कोणते धोरण आंखले पाहिजे याचा उमज पडेल.
 सत्याग्रहाचा पहिला लढा महात्माजींनीं दक्षिण आफ्रिकेंत लढविला. त्याच वेळी एका सभेंत भाषण करून सत्याग्रह व निःशस्त्र प्रतिकार यांतील फरक त्यांनीं स्पष्ट करून सांगितला. निःशस्त्र प्रतिकार हे दुर्बलांचें साधन आहे. आपल्याजवळ शस्त्रं नाहींत म्हणून या मार्गाचा अवलंब करणे भाग