पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५०
भारतीय लोकसत्ता

अलौकिकता आहे. येथे लोकसत्तेचा पुढे मागें उत्कर्ष होईल असा विश्वास वाटतो तो जनतेच्या या जागृतीमुळेच.
 सत्याग्रह, कायदेभंग, करबंदी या चळवळीचें खरें कार्य शत्रूर्चे हृदय- परिवर्तन हे नसून जनताजागृति हें आहे, हें मागें सांगितलेच आहे. या जागृतीची जी अंतिम सीमा महात्माजींनीं सांगितली होती ती कांहीं अंशी तीस सालच्या चळवळीनेंच गांठली होती. विधिमंडळे व न्यायालये यांवरील बहिष्कार, सरकारी नोकऱ्यांचा त्याग, कायदेभंग व करबंदी या पायऱ्यानंतर पोलीस व लष्कर यांनीं सरकारशीं असहकारितां करणे ही शेवटची पायरी, असे महात्माजींनी सांगितले होते. यामध्ये फार मोठे तत्त्व आहे. परकीय आक्रमण नष्ट करण्यासाठीं प्रारंभींच लष्करांत क्रांति घडविणे हा मार्ग अयोग्य आहे. जनतेंत जागृति झाली, लोक संघटित झाले, ते निग्रहानुग्रहास समर्थ झाले, म्हणजे त्यानंतर लष्कर जागृत होणे यांतच लोकशाहीचा खरा विकास आहे. प्रारंभींच लष्करी क्रान्ति झाली तर परकीय आक्रमण एखादे वेळीं नष्ट होईलहि, पण मग देशावर त्या लष्कराचे आक्रमण सुरू होईल. जर्मनी, इटली, चीन, जपान येथे हेच झाले, हे मागें सांगितलेच आहे. पण जनता जागृत व संघटित होऊन ती सैन्याचे नियंत्रण करण्यास समर्थ झाली म्हणजे मग सैन्य जागृत होऊन ते जनतेकडे येणे हा लोकसत्ताक क्रांतीचा स्वाभाविक क्रम होय. १९३० साली येथील जागृति याच स्वाभाविक क्रमाने चालली असल्याचे एक मोठेच गमक निदर्शनास आले. सरहद्द प्रांतांत हा प्रसंग घडला. तेथे खानबंधूंची खुदा-इ-खिदमतगार ही चळवळ फोफावत चालली होती. त्यांच्या एका सभेवर सरकारला गोळीबार करावयाचा होता. म्हणून गढवाल पलटणीतल्या शिपायांना तिकडे जाण्याचा हुकूम देण्यांत आला. त्या शिपायांनीं आपल्या निःशस्त्र बांधवांवर गोळी झाडण्याचे नाकारलें. आत्मक्लेशाच्या मार्गाने स्वकीयांचा-परकीयांचा नव्हे- हृदयपालट होतो तो असा. लष्कर ही आक्रमकांची आदिशक्ति होय. परवश असलेली ही आदिशक्ति स्ववश करून घेणें ही निःशस्त्र प्रतिकाराची परिपूर्ति होय. १९३० साली सैनिकांत जी जागृति झाली ती अगदीं अल्परूप होती, तरी तिचे महत्त्व या दृष्टीने फार मोठें आहे. शत्रूच्या बालेकिल्ल्याला पहिला सुरुंग लागला असा त्या घटनेचा अर्थ होता. ब्रिटिश