पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५२
भारतीय लोकसत्ता

आहे, असे त्याचे पुरस्कर्ते समजतात. त्या पुरस्कर्त्यांच्या मते हे निःशस्त्र लढे भावी सशस्त्र लढ्यांची पूर्वतयारी म्हणून लढावयाचे असतात. त्यांनी जनताजागृति होते. प्रक्षोभ वाढतो आणि अखेरीस सशस्त्र लढा यशस्वी होण्याचा संभव निर्माण होतो. सत्याग्रह हें साधन गांधींच्या मते या जातीचे नाहीं. ते प्रबलांचे शस्त्र आहे. त्यांत शत्रूला प्रेमाने जिंकावयाचे आहे. शस्त्र नाहीं म्हणून त्याचा अवलंब करावयाचा असे नसून ते सर्वात प्रभावी साधन आहे म्हणून त्याचा अवलंब करावयाचा असतो. ते सर्वात प्रभावी व समर्थ आहे याचे कारण असे कीं, तें आत्मिक सामर्थ्य आहे आणि इतर साधने हीं जड व पाशवी आहेत. म्हणून सत्याग्रह व निःशस्त्र प्रतिकार यांचा कोणी घोटाळा करूं नये.
 महात्माजींनीं दक्षिण आफ्रिकेत १९०६ सालीं जर्मिस्टन येथे सत्याग्रहाचे विवेचन केले त्याचा आशय वर दिला आहे. त्यावरून असे स्पष्ट होते कीं ते सत्याग्रहाला निःशस्त्र प्रतिकार म्हणून संबोधण्यास कधींच तयार नव्हते. पण काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखालीं केलेले लढे व स्वतः महात्माजींनीं स्वतंत्रपणें केलेले लढे यांचा इतिहास आपण जर नीट पाहिला तर आपणांस असें दिसून येईल की खऱ्या अर्थाने त्यांतील एकाहि लढ्याला सत्याग्रह म्हणतां येणार नाहीं. जेव्हां जेव्हां लढ्यांत यश आले तेव्हां तेव्हां त्या लढ्यांतून जनतेची जी 'अद्भुत नियामक शक्ति' शत्रूला दिसली तिला तो भ्याला होता व म्हणूनच नमला असे दिसतें. जनरल स्मटस् किंवा एखादा चंपारण्यांतील युरोपीय मळेवाला यांच्या मनाचे क्षणभर परिवर्तन झाले असले तरी त्यावरून आफ्रिकन सरकारला किंवा युरोपीय मळेवाल्यांना हिंदी लोकांबद्दल प्रेम वाटू लागले होतें असें कोणी म्हणेल असे वाटत नाहीं. खुद्द महात्माजींनाहि आपल्या पंचवीस वर्षांच्या संग्रामांनी किंवा उपोषणांनी ब्रिटिशांचे हृदयपरिवर्तन केलें असें वाटलें नाहीं. (शिखरे चरित्र पृ. ४४९). त्याचप्रमाणे ज्या जनतेनें मळेवाल्यांशी किंवा ब्रिटिश सरकारशी लढा दिला, तिच्या मनांत या शत्रूबद्दल प्रेम वाटत होते असे म्हणण्याचे धाडस कोणी करील असेंहि वाटत नाहीं. पण शत्रूबद्दल प्रेम वाटणे व त्याचा हृदयपालट घडवून आणून शेवटीं त्याला आपल्यावर प्रेम करावयास लावणे, हे तर सत्याग्रहाचें मूल तत्त्व आहे. तेव्हां हिंदुस्थानांत जे लढे झाले ते महात्माजींनीं