पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४९
जनताजागृति

 १९३० सालच्या या संग्रामाचें आपण जितके बारकाईनें अवलोकन करूं तितकें जास्त स्पष्टपणे, भारतीय लोकसत्ता महात्माजींची किती ऋणी आहे हे आपल्या ध्यानीं येईल. ब्रिटिश सरकारच्या राज्याचें कायद्याचे अधिष्ठान नष्ट करावयाचेंच या हिरिरीने भारताचा शेतकरी या संग्रामांत उतरला होता. धारासना येथे २५०० लोकांनी मिठागरावर हल्ला केला. वडाळ्याला ही संख्या पंधरा हजारांवर गेली. संगमनेरला एक लाख लोकांनीं जंगलाचा कायदा तोडला. बागलाणांतील भीलवाड या क्षेत्राच्या ठायींहि असाच एक लाख लोकांनी कायदेभंग केला. या मोहिमेंत दोन हजारावर तर स्त्रियाच होत्या. साक्री (खानदेश), चिरनेर (पनवेल), बिळाशी (सातारा) विरमगांव, विलेपार्ले, शिरोडा इ. अनेक ठिकाणी सहस्रावधि शेतकऱ्यांनी आपल्या ठायीं लढा जागृत झाला असल्याचीं लक्षणें स्पष्टपणे प्रकट केलीं. कर्नाटकांत तीन लाख ताडीची झाडें तोडण्यांत आली. संयुक्तप्रांत, पंजाब, बिहार, बंगाल, येथेहि कायदेभंगाच्या चळवळीला असेंच उधान आलें होतें. मुंबई, सोलापूर, पेशावर हीं तर नित्याचींच रणक्षेत्रे झाली होतीं. मिठाचा कायदा मोडणे, जंगलचा कायदा तोडणे, निरोधन करणं, बहिष्कार घालणें, करबंदी करणे, जप्त वाङ्मय जाहीरपणें वाचणें व विकणें, बेकायदा सभा भरविणे व मिरवणुका काढणें इ. अनेक मार्गांनी जनतेनें राज्ययंत्राला हादरे देऊन ते खिळखिळे करून टाकलें. प्रत्यक्ष तुरुंगांत असें सव्वा लक्ष लोकच गेले. पण वरील अनेक मार्गांनीं, सरकारला आव्हान देऊन, प्रत्यक्ष कायदेभंग करून लाठी व गोळी खाण्याची सिद्धता ज्यांनीं दाखविली, त्यांची संख्या याच्या दसपट तर सहजच होती. शिवाय गिरण्या, रेल्वेचे कारखाने, इतर कारखाने यांतील लक्षावधि कामगारांनी संप पुकारून सहानुभूति दाखविली ती निराळीच. या चळवळीचें महत्त्व आहे ते यासाठीच. या देशावर पारतंत्र्यामुळे जी आपत्ति आली होती तिची खरी झळ या बहुसंख्य जनतेलाच लागत होती. दारिद्रय, उपासमार, रोग, गुलामगिरी या यातना खऱ्या तिच्या कपाळीं आल्या होत्या. त्याची तिला आतां जाणीव होऊन ती या आक्रमणाच्या प्रतिकारार्थ सिद्ध झाली. यांतच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची