पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४
भारतीय लोकसत्ता

कॉंग्रेसचे पुन्हां अध्यक्ष झाले तेव्हां त्यांनीं गांधींना प्राणभूत वाटणाऱ्या विधायक कार्यक्रमाचा एकहि ठराव केला नाहीं. त्याचा नामनिर्देशहि केला नाहीं. काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांची हीच वृत्ति होती. याचा अर्थ असा कीं लोकांना स्वतंत्रपणे विधायक कार्यक्रमाची महती मुळींच मान्य नव्हती. चरखा हा गांधीजींच्या स्वातंत्र्यसंदेशाचे प्रतीक म्हणून त्यांना स्वीकार्य वाटे. आणि याच दृष्टीने विधायक कार्यक्रमांतील इतर भागाकडे लोक पहात. स्वातंत्र्य व क्रान्ति या कल्पना अमूर्त आहेत. त्यांचे नित्य स्मरण रहावें व त्या प्रेरणा लोकांच्या मनांत मूळ धरून बसाव्या येवढ्यासाठीं चरख्याचे महत्त्व फार होते. त्याला आर्थिक बाजू असल्यामुळे दुधांत साखर पडल्यासारखे झाले. पण खरें दूध म्हणजे लढ्याचा संदेश, स्वातंत्र्याची प्रेरणा हेच होते. ती प्रेरणा व तो संदेश खेडुतांच्या घरोघर नेऊन पोचविण्याचे फार मोठे कार्य चरखा व खादी यांनीं केलें यांत शंकाच नाहीं. याचा अर्थ असा की निःशस्त्र प्रतिकारानें ज्या प्रक्षोभाच्या लाटा जनसागरावर उठविल्या त्या कालांतराने मंदावू लागल्या तरी त्यांनें निर्माण केलेली जागृति कांहीं काल टिकवून धरण्यासाठी विधायक कार्यक्रमाचा फार उपयोग झाला. खादीचा प्रसार, मद्यपान- निषेध, गांवसफाई, प्रौढशिक्षण, ग्रामोद्योग, राष्ट्रभाषेचा प्रसार, जातीय ऐक्य या निमित्ताने काँग्रेसचे पाईक देशाच्या कान्याकोपऱ्यांत जाऊन पोचले, खेडुतांत, कामगारांत मिसळले आणि त्यांनीं वरच्यापैकी कोणच्या ना कोणच्या प्रतीकाच्या साह्याने काँग्रेसचा स्वातंत्र्याचा, क्रान्तीचा संदेश घरोघर पोचविला व तेथे तो स्थिर केला. खादी, हातसडीचे तांदूळ, भरड कागद यांचें आध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या महात्माजींना जे महत्त्व वाटे त्याचीं फारशी कोणाला जाणीवहि नव्हती. म्हणजे विधायक कार्यक्रमाचा आध्यात्मिक हेतु विफल झाला पण त्याने लोकक्रान्तीला अवश्य ती जागृति मात्र कांहीं अंशी घडवून आणिली व टिकवून धरली. 'दि इल्यूजनस् ऑफ चरखा' या पुस्तकांत अनिल बरण रे यांनीं व्यवहाराच्या व अर्थशास्त्राच्या दृष्टीनें खादीवर जे आक्षेप घेतले आहेत ते सर्व खरे वाटतात; पण खादीने राजकीय जागृति घडवून आणली हे जे राजेन्द्रबाबूंनी त्या आक्षेपांना उत्तर दिले आहे, ते तितकेच खरे आहे. जे खादीचे तेच एकंदर विधायक कार्यक्रमाचें. काँग्रेसच्या मध्यमवर्गीय सुशिक्षित पाईकांना क्रान्तीच कांहीं दृश्य प्रतीक