पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४५
जनताजागृति

त्याच्याबद्दल त्याला फार मोठ्या आशा होत्या, पण त्या अगदीं धुळीस मिळाल्याने त्याला घनदाट निराशा सर्वत्र दिसू लागली आणि गांधीजींनीं 'पुढे काय?' या प्रश्नाला जें उत्तर दिले तेंहि फारसे आशादायक नव्हते. 'विधायक कार्यक्रम' हे त्यांचे उत्तर होते. या त्यांच्या कार्यक्रमाचाही आपण वरच्याच दृष्टीने विचार केला पाहिजे. सत्याग्रहाचे जसें लोकशाहीच्या दृष्टीने आपण मूल्यमापन करीत आहों तसेंच याचे केले पाहिजे. खादी, ग्रामोद्धार, अस्पृश्यतानिवारण, मद्यपानबंदी, जातीय ऐक्य, मूलोद्योग शिक्षण, गांव- सफाई, प्रौढशिक्षण इ. बहुविध कार्यांचा गांधीजींनीं विधायक कार्यक्रमांत अंतर्भाव केला होता. सत्याग्रहाचा अंतिम हेतु जसा भारताच्या राजकीय स्वातंत्र्याहून अगदीं निराळा होता, त्याचप्रमाणें विधायक कार्यक्रमाचाहि अंतिम हेतु गांधींजींच्या मनांत निराळा होता. अखिल भारतीय जीवन आमूलाग्र बदलून टाकावें, पाश्चात्य संस्कृतीचे आपल्यावर दृढ होत चाललेले वर्चस्व नष्ट करावे आणि साधी, ग्रामप्रधान, वैराग्याभिमुख अशी भारतीय संस्कृति निर्माण करावी हे महात्माजींच्या मतें विधायक कार्यक्रमाचे उद्दिष्ट होतें. म्हणजे सत्याग्रहाप्रमाणेच विधायक कार्यक्रमाचाहि हेतु भरतभूमीची आध्यात्मिक प्रगति हाच होता. पण सत्याग्रह जसा उच्च आध्यात्मिक पातळीवरून, प्रत्यक्षांत येतांना, निःशस्त्र प्रतिकाराच्या भौतिक पातळीवर आला आणि म्हणूनच लोकजागृतीचे महान् कार्य त्याने साधले त्याचप्रमाणे विधायक कार्यक्रमाचहि झाले. निःशस्त्र प्रतिकाराचे जे लोकजागृतीचे कार्य त्याला पोषक असा जेवढा भाग विधायक कार्यक्रमांत होता तेवढ्यालाच तेज प्राप्त झाले व हें तेजहि विधायक कार्यक्रमाचा पुढे करावयाच्या लढ्याशीं स्पष्ट संबंध दिसत असे तेवढ्यापुरतेच टिकून राही. एरवीं विधायक कार्यक्रम लोकांना अगदीं नीरस, शुष्क व हेतुशून्य असा वाटे. १९२२ नंतर कायदेभंग व करबंदी गेली व गाधीजींनीं आणि काँग्रसने देशाला विधायक कार्यक्रम करीत रहा, असा आदेश दिला. पण एकदोन वर्षांतच त्याची गति मंदावली व पुढे पुढे तर लोक त्याची चेष्टा करूं लागले. पं. जवाहरलाल यांना तर विधायक कार्यक्रमाचा फारच कंटाळा असे, खादीविरुद्ध ते एखादे वेळी अगदी उसळून उठत. १९३५ सालीं युरोपांतून आल्यावर ते जेव्हां
 भा. लो....१०