पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४७
जनताजागृति

खेडोपाडी घेऊन जाण्यास हे साधन फार उपयोगी पडले; पण लोकजागृतीचे खरे प्रभावी साधन म्हणजे कायदेभंग हेंच होय हे आपण विसरू नये.

स्वातंत्र्य संग्राम

 बार्डोलीनंतर आठ वर्षांनी १९३० साली महात्माजींच्या दांडीप्रयाणानें सुरू झालेला जगविख्यात असा सत्याग्रह संग्राम झाला. त्याची तयारी महात्माजी वर सांगितल्याप्रमाणे विधायक कार्यक्रमानें करीत होते; पण त्याच्याच बरोबर त्या आठ वर्षांत ब्रिटिश सरकारच्या सत्तेस आव्हान देऊन तिच्याविरुद्ध लोकांनीं अनेक लहानमोठे संग्राम केले त्यामुळेच जनतेत खरें चैतन्य टिकून राहिले व तिचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला. मुळशी पेट्यांत आपल्या जमिनी जाऊं नयेत म्हणून शेतकऱ्यांनी लढा केला. दरवडेखोरांना सामील असल्याच्या खोट्या आरोपावरून गुजराथेतील बोरसद तालुक्यावर सरकारने जादा पोलीस बसवून खेडुतांना जबर दंड केला होता. त्याविरुद्ध त्या तालुक्यांतील लोकांनीं सत्याग्रह करून सरकारला माघार घेण्यास भाग पाडिलें, शीखांनी केलेला 'गुरुका बाग' सत्याग्रह प्रसिद्धच आहे. १९२३ साली नागपूरला राष्ट्रध्वजाचा अपमान झाला त्या वेळेस अखिल भारतांतून स्वयंसेवक जमले व त्यांनी सत्याग्रह करून त्या ध्वजाची इभ्रत राखिली. वरील प्रत्येक सत्याग्रहांत एक हजारपर्यंत लोक तुरुंगांत गेले होते. लाठीमार याच्यापेक्षा किती तरी जास्त लोकांनीं साहिला आणि तो साहतां साहतां अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ति भरतभूमत निर्माण झाल्याची ग्वाही दिली. १९२८ साली बार्डोलीस सरदार वल्लभभाईच्या नेतृत्वाखालीं झालेला सत्याग्रह हा मोठाच संग्राम होता. सारावाढ हे त्याचे कारण होते आणि ती इंग्रजी राज्याची खरी नस होती. हे ओळखूनच १८९६ सालापासून टिळकांनीं तिच्यावर प्रहार करण्यास प्रारंभ केला होता. तोच लढा आतां महात्माजींच्या अभिनव पद्धतीने रंगास आला होता. सरदारांनी सर्व तालुका संघटित करून त्याला एखाद्या लष्करी छावणीचे रूप आणले. झगडा, लढा, प्रतिकार, संग्राम या शब्दांनी वातावरण अगदीं कोंदून गेलें होतें. लढा सुरू झाला. सरकारने अनन्वित जुलूम केले. धमकी, दंड, कैद,