पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४४
भारतीय लोकसत्ता

तेवढ्यामुळे सरकारचें विशेष नुकसान होणार आहे असे नाहीं. पण सरकारच्या राक्षसी सामर्थ्याला अवहेलून अखिल जनता-- केवळ मूठभर दहशतवादी नव्हे-- कायदेभंगाला किंवा करबंदीला सिद्ध होते यांत विश्वव्यापी अर्थ आहे. हे इतके लोक प्रबुद्ध झाले, आपल्या देशाची उन्नति- अवनति त्यांना उमजूं लागली आणि देशाच्या उन्नतीसाठी वाटेल तो त्याग, प्राणत्यागसुद्धां करण्यास ही जनता सिद्ध झाली असा विशाल अर्थ या घटनेत समावलेला आहे आणि तोच अर्थ या भूमीत महात्माजींनी प्रगट केला.
 वर सांगितल्याप्रमाणे १९१९ सालीं रौलेटविलाविरुद्ध जी चळवळ झाली तिच्या वेळी महात्माजींच्या सत्याग्रहाला प्रथम अखिल भारतीय रूप प्राप्त झाले. पुढील वर्षी खिलाफतीची चळवळ झाली; आणि नंतर बार्डोलीच्या संग्रामाची महात्माजींनी सिद्धता केली. हा संग्राम आयत्या वेळीं महात्माजींनीं स्थगित केला व त्यामुळे निराशेची फार मोठी लाट देशावर आली हे खरे, पण मार्च १९९९ ते मार्च १९२२ या पहिल्या मोहिमेमुळे या देशांत नवयुग निर्माण झाले यांत शंका नाहीं. जर्मनीसारख्या अत्यंत बलाढ्य व शस्त्रास्त्रांनी संपन्न अशा देशाला ब्रिटिशांनी नुकतेच लोळविले होतें. त्यामुळे अशा बलशाली राष्ट्रापुढे शस्त्रास्त्राच्या लढाईत आपला निभाव लागेल अशी पुसटसुद्धां आशा येथे कोणाला वाटत नव्हती. शस्त्रास्त्राच्या लढाईत आशा नाहीं आणि दुसरा कोणचाहि मार्ग माहीत नाहीं यामुळे १९१८/१९ साली भारतीय जनतेवर निराशेची अत्यंत घोर अशी अवकळा पसरली होती. सामान्य जनता अजून राजकारणांत फारशी आलीच नव्हती आणि जो मध्यमवर्ग चळवळीच्या आघाडीवर होता तो शत्रूच्या या भयानक सामर्थ्याच्या दर्शनाने हबकून गेला होता. अशा वेळीं महात्माजींनी जेव्हां हें नवीन अस्त्र लोकांच्या हातीं दिले आणि ब्रिटिशांसारखा समर्थ शास्ताहि या अस्त्रापुढे नमतो हें लोकांना सप्रयोग दाखवून दिले तेव्हां या भूमींत कांहीं अपूर्व उत्साह व आशा निर्माण झाली असल्यास नवल नाहीं.
 बार्डोलीचा संकल्पित लढा स्थगित झाल्यानंतर, पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला. या लढ्याकडे सारा भारतवर्ष डोळे लावून बसला होता.