पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४२
भारतीय लोकसत्ता

मानसिक यातना आणि इतर आपत्ति या शांतपणे सोसणे हे जें सत्याग्रहाचे लौकिक रूप तेंच फक्त येथे अभिप्रेत आहे आणि त्या दृष्टीने पाहतां असें निश्चित वाटतें कीं, या पंचवीस वर्षांच्या सत्याग्रहसंग्रामाने लोकसत्तेच्या दृष्टीनें भारतीय जनतेत जेवढी प्रगति झाली तितकी दुसरी कशानेंहि झाली नसती. या संग्रामाचें प्रधान कार्य म्हणजे लोकजागृति हें होय. शासन स्वकीय असो वा परकीय असो, तें जर जुलमी असेल तर देशांतील जनतेची तें अनेक प्रकारांनी गांजणूक करीत असतें. लोकांना त्यामुळे अनंत यातना सोसाव्या लागतात. या यातना दूर करण्यासाठी संघटित होऊन त्या सरकारला शस्त्रबळाने किंवा मतांच्या संख्याबलाने पदच्युत करणे हाच उपाय असतो. पण या उपायाचा अवलंब करण्यास जनता जागृत असावी लागते. नाहीं तर हे मार्ग व्यर्थ होत. अशा वेळीं त्या यातना दूर करण्यासाठी देशांतील कांहीं धीर पुरुष सरकारच्या कायद्यांचा भंग यरून त्यासाठी होणारी शिक्षा शांतपणे भोगू लागले कीं, बाकीच्या जनतेत हळूहळू प्रक्षोभ होऊन ती जागृत होऊं लागते आणि हे आंदोलन सर्वव्यापी होऊं लागतें. मूलतः सत्याग्रह हा प्रेमाचा मार्ग असून त्यामुळे हळूहळू प्रतिपक्षाचा हृदयपालट घडविणें हें त्याचें अंतिम उद्दिष्ट असते. महात्माजींनीं त्याचा जो पुरस्कार केला तो याच उदात्त पातळीवरून. जुलूम करणाराचा हृदयपालट घडविणे किंवा जुलूम निमूटपणे सहन करणाऱ्यांचा स्वाभिमान जागृत करून, त्यांची शक्ति संघटित करून जुलमी शासकाला नमविणे, हे जुलूम नाहींसे करण्याचे दोन उपाय होत. महात्माजींनीं सत्याग्रह सुरू केला तो पहिल्या हेतूनें. पण आतांपर्यंतच्या इतिहासावरून हे ध्यानी येईल की सत्याग्रहाचें हें सात्त्विक रूप प्रत्यक्षांत कधींच दिसलेलें नाहीं. जे भांडवलदार, जमीनदार किंवा जे इंग्रज राज्यकर्ते यांच्याविरुद्ध जनतेने सत्याग्रह केला त्यांचा अणुमात्रहि कधीं हृदयपालट झाला नाहीं. पण त्यामुळे माझ्यामतें महात्माजींच्या सत्याग्रह संग्रामांचे महत्त्व मुळींच कमी होत नाहीं. कारण प्रतिपक्षाचा जरी त्यामुळे हृदयपालट झाला नाहीं तरी भारती जनतेचा हृदयपालट, कायाकल्प निश्चित झाला आहे. शतकानुशतकें पारतंत्र्यांत पिचत पडलेला, स्वतःच्या हीनदीन स्थितीची आणि गुलामगिरीची जाणीवहि नसलेला, अज्ञान व दारिद्र्य यांनी ग्रासलेला, अन्यायाचा प्रतिकार स्वप्नांतहि न करणारा असा हा भारतीय