पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४०
भारतीय लोकसत्ता


नव्या युगाचे शस्त्र– सत्याग्रह

 चंपारण्यांतील या विजयामुळे भारतीय जनतेत एक अपूर्व चैतन्य निर्माण झाले. ब्रिटिशासारख्या बलशाली, सार्वभौम, अजिंक्य सत्तेविरुद्ध आपण अगदी सामान्य शेतकरी हात उचलू शकूं ही आशा त्या लोकांच्या स्वप्नांतहि कधीं आली नसेल. कधीं संग्राम करण्याची वेळ आलीच तर तो तेथले बडे लोक करतील; येथले राजे, सरदार, जमीनदार यांचें तें काम आहे; आपल्या हातीं त्यांतले कांहीं नाहीं; आपण गरीब लोक हमाली, कष्ट, सेवाचाकरी यापलीकडे कांहीं करूं शकणार नाहीं, ही भावना बहुसंख्य भारतीय जनतेच्या मनांत युगानुयुगें दृढमूल होऊन बसली होता. आतां तिच्या असें ध्यानांत आले की आपल्याहि हातीं एक शस्त्र आहे आणि मनांत आणले तर या शस्त्रानें कोणच्याहि प्रचंड शक्तीशीं आपण सामना देऊं शकूं. या नव्या जाणीवेने तिच्या अंगी केवढा आत्मविश्वास संचरला असेल याची कोणालाहि सहज कल्पना करतां येईल. सत्याग्रह संग्रामाची अलौकिकता आहे ती यांत आहे. दीन, दुबळे, दलित, निःशस्त्र युगानुयुग दास्यांत खितपत पडलेले असे जे बहुसंख्य मानव त्यांना आपली उन्नति करून घेण्याचें एक अमोघ साधन सत्याग्रहानें प्राप्त करून दिलें. लोकशाही राज्यपद्धति सत्याग्रहाची अखंड ऋणी राहील ती यासाठीं. ज्यांच्या आधारावर तिचें मंदिर उभें रहावयाचे ते मानव या संग्रामामुळे व्यक्तित्वसंपन्न होतात.
 चंपारण्यानंतर खेडा जिल्ह्यांत जो लढा सुरू झाला त्यानें युग पालटल्याचे हें चिन्ह स्पष्टपणे दाखवून दिले. दुष्काळाने पिके बुडालीं तरी सरकारने सगळा सारा दडपून वसूल करावा ही गोष्ट नवीन नव्हती. हाच जगाचा इतिहास होता. तरी आतांपर्यंत भारतांतील शेतकऱ्याने असल्या अन्यायाविरुद्ध चकार शब्द काढला नव्हता. आपण कांहींही प्रतिकार करूं शकणार नाहीं ही त्याला मनोमन असलेली जाणीव हीच या दैन्याच्या बुडाशी होती. पण सत्याग्रहाचे प्रभावी शस्त्र त्यांच्या हाती देऊन, अन्यायाचा प्रतिकार करणे तुला शक्य आहे, वाटेल त्या शक्तीशीं तूं लढू शकशील, तिला नमवूं शकशील, असा दिव्य संदेश महात्माजींनी त्याला दिला. त्याबरोबर त्या दलित मनाचे रूप अंतर्बाह्य पालटून गेले. 'राजकीय शिक्षा लौकिक शिक्षेस