पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३८
भारतीय लोकसत्ता

माहीत नव्हता. पण याच हीन- दीन- दलित जनतेतून स्वजनासाठीं आत्मार्पण करणारे वीरपुरुष महात्माजींनी निर्माण केले; शीलासाठी जोहार करणाऱ्या अंगना यांतूनच निर्माण झाल्या; 'स्व' जाणणे व त्याच्या रक्षणासाठी संग्रामाला व आत्मार्पणाला सिद्ध होणे हाच लोकशक्तीचा पाया, हीच जनता जागृति, हाच राष्ट्रशक्तीच्या गंगौघाचा प्रभाव.
 निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची सत्ता ती लोकसत्ता होय. पण हें लोकसत्तेचे केवळ बाह्यरूप झाले. आपल्या भूमीची उन्नतिअवनति, तिचें स्वातंत्र्य पारतंत्र्य, तिची कीर्तिअपकीर्ति यांची चिंता प्रत्येक नागरिक- नारायणस्वामी, नागप्पा, वलीअम्मा यांसारखे मजूरसुद्धां- ज्या शासनांत वाहूं लागतो तेच शासन लोकसत्ता या अभिधानास पात्र आहे. एरवीं या पातळीवरच्या लोकांना स्वदेश, स्वभूमि, संस्कृति, प्रगति यांच्या कल्पनाहि नसतात. त्यांच्या जीवनांत यांचा प्रवेश झालेला नसतो. पण अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ति ही अशी कांहीं दिव्य संजीवनी आहे कीं, तिच्या नुसत्या सिंचनाने या पशुसम मानवांत दिव्यस्फुरण होऊं लागतें. त्यांचे जीवन पालटून जाते. त्यांच्या 'स्व' च्या मर्यादा वाढतात. धैर्य, चिकाटी, त्याग, निष्ठा, बंधुभाव इ. गुणांचा प्रादुर्भाव त्यांच्या ठायीं होतो आणि अंती लोकसत्तेस अवश्य ते 'लोक' त्यांच्यातून निर्माण होतात. महात्माजींनी भारतीय लोकसत्तेची जी सेवा केली ती ही होय. टिळकांनी भारतांत असंतोष धुमसत ठेविला होता. येथील जनतेत ते 'लढा' निर्माण करीत होते आणि त्यासाठीं अखिल भारतीय जनतेला ते आवाहन करीत होते. पण तें अजून तिच्या कानापर्यंत नीट पोचले नव्हतें. सुशिक्षित मध्यमवर्गा- पर्यंतच ती हांक गेली होती. महात्माजींनी तेथूनच प्रारंभ केला आणि चंपारण्य, खेडा, जालियनवाला, दांडी, अशा एकसारख्या चढत चाललेल्या मोहिमांनी स्वदेश, स्वातंत्र्य, समता, या विषयींच्या निष्ठांचे जनतेत बीजारोपण केले. अखेरपर्यंत त्यांचे जागृतीचे साधन एकच होते. आक्रमकांविरुद्ध लढा, अन्यायाचा प्रतिकार ! वर सांगितल्याप्रमाणे ही एक वृत्ति निर्माण होतांच समाजाचे रूप पालटून जाते. पशूचे मानव होतात, मानवांत अनंत सद्गुणांचा उद्भव होतो आणि 'लोक' या महनीय पदावर आरूढ होण्याची योग्यता त्यांच्या ठायीं निर्माण होते.