पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३७
जनता जागृति

ती सहज पादाक्रांत करील, याविषयीं त्या दोघांच्या मनांत अणुमात्र संदेह नव्हता. या दोन्ही विभूति सर्वस्वी स्वयंभू व स्वयंप्रकाश अशा असूनहि अगदीं प्रारंभापासून त्यांनी कार्याची जी दिशा आंखली ती याच तत्त्वानें. आणि हेच भरतभूमीचें विशेष भाग्य होय. इटलीमध्ये मॅझिनीचे सहकारी व त्यांच्या मागून आलेले इटालियन नेते हे दंडसत्तेचे पुरस्कर्ते होते आणि चीनमध्ये डॉ. सनयत्सेन यांचा वारसा चिआंग कै शेक या दण्डधराकडे गेला. त्यामुळे या दोन्ही देशांत लोकसत्ता मूळच धरूं शकली नाहीं. हिंदुस्थानांत लोकशाहीच्या वृत्तीचे बीजारोपण झाले आणि पुढेमागें केव्हां तरी त्यांतून तो कल्पवृक्ष निर्माण होण्याची आशा वाटते याचें मुख्य कारण हेच होय की, येथे टिळकांच्या मागोमाग राष्ट्राची धुरा महात्माजींनीं खांद्यावर घेतली.

लोकशक्तीचा पाया

 सामान्य मानवाची शक्ति जागृत करावयाची याचा नेमका अर्थ काय ते महात्माजींचे आफ्रिकेतील कार्य पाहतांच कळून येईल. नारायण स्वामी, स्वामी नागप्पा, वली अम्मा हे केवळ मुदतबंदीचे मजूर होते. नागप्पा व वली अम्मा हीं तर सतराअठरा वर्षांची पोरें होतीं. महात्माजींच्या आगमनापूर्वी त्यांच्या जीवनाची पातळी कोणची होती ? अहोरात्र काबाडकष्ट, गुलामगिरी आणि कांहीं चूक झाल्यास किंवा न झाल्यासहि लाथाबुक्या ! आणि इतकेहि करून पोटाला पुरेशी भाकरी नाहींच ! यांतच त्यांचा जन्म, यांतच त्यांचा मृत्यु. या स्थितींतून हीं माणसें कोणच्या उंचीला गेलीं ? मायभूमीच्या उद्धारासाठीं, सेवेसाठीं अन्यायाचा प्रतिकार करीत करीत यांनी आत्मबलिदान केले. यापेक्षां जास्त उंच, जास्त उदात्त असे मानवी जीवनांत कांहीं नाहीं. जमिनीवरून सरपटत जाणाऱ्या त्या मजुरांना पूर्वकाळ नव्हता व भावी काळहि नव्हता. तो त्यांच्या जीवनांत निर्माण झाला. स्वदेश, स्वधर्म, आत्मसामर्थ्य ही वैभवें कित्येक पिढ्यांत त्यांच्या स्वप्नांतहि नव्हती. अवमान सोशीत, लाथा खात, कष्ट करीत, भुकेल्या पोटीं राहून, पिचून पिचून मरून जावें, हाच त्यांचा आयुष्यक्रम. अन्यायाचा प्रतिकार, स्वत्व- रक्षणासाठीं संग्राम, जुलमाविरुद्ध लढा या शब्दसंहतीचा अर्थहि त्यांना