पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३५
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

सांगण्यास प्रारंभ केला होता तरी प्रत्यक्ष स्वतः कायदेभंग त्यांनीं कधीं केला नाहीं. काँग्रेसकडून तो ठराव करून घेऊन मग त्या रणांत उतरावयाचे असें त्यांचे ठरलेलें होतें. १९१७ सालापर्यंत काँग्रेसला त्यांनी तिकडे जवळ जवळ खेचीत नेलेंच होते. २८ जुलै १९१७ रोजी भरलेल्या ऑ. इं. कॉ. कमिटीने, सर्व प्रातिक काँग्रेस कमिट्यांनीं निःशस्त्र प्रतिकाराचा विचार करून आपला निर्णय कळवावा असा आदेश दिला होता. त्यावेळीं आनेक प्रांतिक कमिट्यांनीं अनुकूल निर्णय दिला होता. एवढ्यांत माँटेग्यू यांचा २० ऑगस्टचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यामुळे सर्वच वातावरण बदललें. सरकारी भेदनीति यशस्वी होऊन नेमस्त पक्ष काँग्रेसमधून फुटला आणि अशा सुधारणांना विरोध करणे किंवा त्यावर बहिष्कार घालणे हे देशद्रोहीपणाचे आहे असे सुरेन्द्रनाथांसारखे मवाळाग्रणी म्हणू लागले. (ए नेशन इन् दि मेकिंग पृ. ३१३) काँग्रेसनेंहि यामुळे निःशस्त्र प्रतिकाराचा विचार पुढे ढकलला आणि म्हणून टिळकांनींहि आपल्या ठरीव धोरणाप्रमाणे सबूर केली. मात्र त्यामार्गाचे महत्त्व पटविण्याचे कार्य त्यानीं थांबविलेले नव्हतें, अवन्तिकाबाई गोखले यांनी १९१८ साली लिहिलेल्या गांधीचरित्राला टिळकांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यांत गांधींच्या सत्याग्रहाची प्रशंसा करून टिळकांनीं, महात्माजींनी तो मार्ग आपल्या तपश्चर्येनें शास्त्रपूत करून ठेविला आहे, असे म्हणून, त्यांना धन्यवाद दिले आहेत. १९१९ सालीं ते विलायतेहून परत आले. त्यावेळी मानपत्राच्या पहिल्या सभेत, रौलट बिलाविरुद्ध गांधींनीं केलेल्या सत्याग्रहांत भाग घेण्यास आपण नव्हतों म्हणून आपणांस वाईट वाटते, असे त्यांनी उद्गार काढले, कारण २१ एप्रिल व ८ जून रोजी ऑ. इं. कॉ. कमिटीने सत्याग्रहावर आपले शिक्कामोर्तब केले होते. महात्माजीशी बोलणे झाले तेव्हां टिळकांनी हेंच सांगितले होते. 'असहकारितेचा कार्यक्रम मला पसंत आहे. पण देश आपल्यामागून येईल की नाहीं याची मला शंका वाटते. लोकांना तुम्ही वळविलेत तर मी चळवळीला उत्साहाने पाठिंबा देईन.' असे ते म्हणाल्याचे महात्माजी सांगतात.
 टिळकांची काँग्रेसविषयीं कोणच्या प्रकारची निष्ठा होती हें वरील विवेचनावरून कळून येईल. अखिल भरतखंडांतील सर्व प्रांत सर्व पक्ष, सर्व धर्म, सर्व वर्ग यांचे ऐक्य घडवून त्यांचे बळ या राष्ट्रसभेच्या मागें