पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३४
भारतीय लोकसत्ता

यामुळें कृति करतांना काँग्रेसने घालून दिलेल्या मर्यादेबाहेर जावयाचे नाहीं हें त्यांचे निश्चित ठरले होतें. आणि काँग्रेस अजून बरीच नेमस्त व मवाळ असल्यामुळे टिळकांना पुष्कळ वेळां नेमस्त व्हावे लागे. विलायतेत बेझंट व इतर जहाल म्हणविणारे लोक यांनी टिळकांवर हाच आरोप केला. त्याला टिळकांनी केसरींतून पुढीलप्रमाणे उत्तर दिलें. 'विलायतेत टिळक मॉडरेट झाले होते असे बेझंटबाई म्हणतात, पण राष्ट्रीयसभेच्या ठरावांत रेसभर देखील फरक न करतां ते ठरावच सयुक्तिक, न्याय्य खऱ्या मुत्सद्देगिरीचे आहेत असे समर्पक रीत्या पण ठासून प्रतिपादन करणे, हे जर बाईंच्या मतें टिळकांच्या मॉडरेटपणाचे लक्षण असेल तर तो आरोप सुखानें माथीं घेण्यास टिळक तयार आहेत. राष्ट्रीयसभेचा मान राखावयाचा का आपलाच हेका अगर अहंकार पुरवावयाचा हा प्रत्येक शिष्टमंडळापुढे प्रश्न होता. (त्या वेळी काँग्रेसखेरीज आणखी तीन शिष्टमंडळे विलायतेस गेली होती.) आणि बाईंचा किंवा इतर शिष्टमंडळांचा कित्ता न गिरवितां टिळकांनी व काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रसभेचे मत ब्रिटिश मजूर पक्षाकडून मान्य करून घेतलें हीच त्यांची मुख्य कामगिरी होय. राष्ट्रसभा चुकत असून हिंदुस्थानचे खरे हित मलाच कळते, असें बाईंना सांगावयाचे होते, तर टिळकांना राष्ट्रसभेची महती स्थापित करावयाची होती.' (टिळक चरित्र- केळकर. खंड ३ भाग ६, पृ. ३४.)
 काँग्रेस हा टिळकांच्या पुढील अचल असा ध्रुवतारा होता. कारण लोकशक्ति जागृत करण्याचे महत्त्व ते जितके जाणीत होते तितकेंच तिच्या संघटनेचे महत्त्वहि जाणीत होते. त्यामुळे तत्त्वज्ञान सांगतांना जितके जहाल सांगतां येईल तितके ते सांगत, पण प्रत्यक्षांत काँग्रेसचे ठराव शिरसावंद्य मानीत, माँटफर्ड सुधारणा जाहीर झाल्या तेव्हां त्या अपुऱ्या व निराशाजनक आहेत असे त्यांनी सांगून टाकले, पण लगेच, स्वीकारनकाराच्या बाबतींत काँग्रेस ठरवील ते आम्ही मान्य करूं, असेंहि त्यांनी जाहीर केलें. (वरील ग्रंथ ३-३-५५). खिलाफत चळवळ त्यांना पूर्णपणे मान्य नव्हती, पण ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच्या आज्ञेप्रमाणे वागण्यास आपण तयार आहों असे त्यांनीं सांगून ठेविले होते. (कॉंग्रेसचा इतिहास, पट्टाभि, पृ. २२८) या धोरणामुळेच १९०५ सालापासून जरी त्यांनी कायदेभंगाचे तत्त्वज्ञान