पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३३
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

मोतीबाबूंना वाटत नव्हतें. पण टिळकानीं तें पातक आपल्या शिरीं घेतले तर समेट होण्याचा संभव आहे असे वाटून ते राष्ट्रीयपक्षाच्या शिबिरांत आले व टिळकांना म्हणाले, 'त्या लोकांना तुमचा बळी पाहिजे आहे. मी तुम्हांला सांगतो तुम्ही तो देऊन टाका. काँग्रेसला वांचविण्यासाठी हा त्याग तुम्ही करावा. असे करतांना तुमच्या विवेकबुद्धीला असह्य यातना होतील. पण काँग्रेससारख्या राष्ट्रीय संघटनेला वांचविण्यासाठी या यातना तुम्ही सहन कराव्या असें माझें सांगणें आहे.' मोतीबाबूंना टिळक वडील बंधूंच्या ठायीं मानीत असत. त्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असे. त्यामुळे ही अत्यंत विलक्षण मागणीहि त्यांनी तत्काळ मान्य केली. ते म्हणाले, 'मवाळपक्ष इतउत्तर काँग्रेसमध्ये राहून कार्य करण्यास तयार असेल, काँग्रेस अभंग रहात असेल तर या सर्व अपेशाचे खापर मी माझ्या माथीं घेण्यास तयार आहे.' पण मवाळांना काँग्रेस भग्नच करावयाची होती. त्यामुळे टिळकांच्या या विलक्षण त्यागबुद्धीचा कांहीं उपयोग झाला नाहीं. (ए स्टेप इन् दी स्टीमर प्रस्तावना- मोतिलाल घोष).
 १९१६ साली टिळकांनीं हिंदी- स्वराज्य- संघाची स्थापना केली. काँग्रेसहून ही संस्था निराळी खरी पण काँग्रेसचेच काम पुढे चालविण्यासाठीं तिचा जन्म होता. बॅ. बॅप्टिष्टा यांना संघाने विलायतेला धाडलें होतें. त्या वेळीं संघाची स्वराज्याची स्वतंत्र योजना होती. पण विलायतेला बॅष्टिष्टांनी काँग्रेसप्रणीत योजनाच मांडावी असा टिळकांनीं निर्णय दिला. कारण काँग्रेस हे बळ आहे, आणि तेच वृद्धिंगत केले पाहिजे ही टिळकांची निष्ठा होती. पुढे टिळक विलायतेला गेले तेव्हांहि त्यांचे हेंच धोरण होते. ज्या मागणीच्या मागें काँग्रेस नाहीं त्या मागण्यांचा पुरस्कार करणे वेडेपणाचे आहे, असें टिळकांचे मत होते. त्यामुळे १९१८ च्या डिसेंबर महिन्यांत दिल्ली येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले त्याची आज्ञा त्यानी शिरसावंद्य मानून त्या अन्वयेंच विलायतेतील चळवळ चालविली. ॲनी बेझंट व इतर कांहीं काँग्रेसमधलीच पुढारी मंडळी तेथील धोरण जरा चढें ठेवावें या मताचीं होती. पण हें टिळकांनी मुळींच मान्य केले नाहीं. चळवळ करतांना काँग्रेसच्या अधिवेशनांत ते सर्व पुरोगामी मतें मांडीत. पण अंतिम निर्णय काँग्रेसचा मानीत. काँग्रेसची जी शक्ति ती आपली शक्ति है ते जाणत होते.