पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३२
भारतीय लोकसत्ता

पक्षांनीं हे ध्यानांत ठेवले पाहिजे की राष्ट्राचा अभ्युदय कशांत आहे तें ठरविणाचा मक्ता परमेश्वराने आपणा एकट्याकडेच दिलेला नाहीं. मवाळ किंवा जहाल या दोन्ही पक्षांना देशहितच साधावयाचे आहे, हें प्रत्येक पक्षानें कबूल केले पाहिजे. दुसऱ्याच्या हेतूच्या शुद्धतेविषयीं कोणीहि शंका घेतां कामा नये. दोन्ही पक्ष एकाच राष्ट्रकार्यधुरेचे वाहक आहेत हे कोणी विसरूं नये. अशा तऱ्हेने सावधगिरी बाळगली की मतभेद, पक्षभेद, यांना भिण्याचे कारण नाहीं. मतभेदांतहि मतैक्य कसे निर्माण करावयाचे याचा निकाल पाश्चिमात्य राष्ट्रांनी दिलेला आहे. संघशक्ति निर्माण करण्यास मतमेदांच निर्मूलन करणे हा उपाय नसून सर्व मतभेद एककार्यवाही करण्याचा प्रयत्न करणे हा आहे (१८-२-१९०८) .
 हें सर्व ध्यानी घेऊन दोन्ही पक्षांनी राष्ट्रसभा अभंग राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दोन्ही पक्षांच्या सहकार्योत जी शक्ति आहे ती हे पक्ष वेगळे झाले तर टिकून रहाणे शक्य नाहीं. आपापली मतें लोकापुढे मांडून लोकांस आज नाहीं तर उद्यां आपले वतीचे करून घेण्याची दोन्ही पक्षाची जी झटापट चालते तीच राष्ट्राच्या प्रगतीचें खरें साधन होय. ही झटापट चालू ठेवूनच दोन्ही पक्षांनीं विशिष्ट कार्यापुरते, विशिष्ट नियमांनी पार्लमेंटांतील भिन्नभिन्न पक्षांप्रमाणे एकत्र झाले पाहिजे आणि वागले पाहिजे (३-३-१९०८).
 राष्ट्रसभेची संघशक्ति अभंग राखण्याचा प्रयत्न करणे, हे टिळकांच्या आयुष्याचें ब्रीद वाक्य होते. त्यासाठी वाटेल ती किंमत देण्यास, वाटेल ती झीज सोसण्यास व वाटेल तो अपमान सहन करण्यास ते नेहमी तयार असत. १९०७ साली सुरतेला काँग्रेसची बैठक मोडली व राष्ट्रीय आणि नेमस्त या दोन्ही पक्षांचे लोक आपापल्या शिबिरांत गेले. त्या वेळीं सर्वांनाच आपल्या राष्ट्रांतील ही सर्वांत मोठी व कार्यकारी संस्था भंगली याबद्दल पराकाष्ठेचें दुःख झाले. आणि कांहीं विचारी नेते दोही पक्षांचे ऐक्य कसे साधतां येईल याचा विचार करूं लागले. अमृतबझार पत्रिकेचे संपादक बाबू मोतीलाल घोष हें अशा विचारकर्त्यात अग्रेसर होते, चर्चा करतांना त्यांच्या असें ध्यानांत आले की काँग्रेस मोडण्याचे सर्व पातक टिळकांच्या माथीं लादावे असा मवाळ पक्षाचा हट्टाग्रह आहे. टिळकांची कांहीं चूक आहे असें