पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३१
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

कशी राखावी या विषयींचे आपले विचार त्यांनी १९०७-८ सालच्या केसरीच्या अंकांतून मांडलेले आढळतात. १९०४ पर्यंत मवाळ जहाल हा भेद राष्ट्रसभेस फारसा जाणवत नव्हता. १९०५ साली वंगभंगाच्या चळवळीपासून त्या भेदाला तीव्र रूप येऊ लागले. १९०६ साली दादाभाईंच्या पुण्याईमुळे प्रकरण विकोपाला गेलें नाहीं; पण १९०७ सालीं ती आपत्ति आली आणि राष्ट्रसभा दुभंगली. त्या वेळीं जहालांनीं म्हणजेच राष्ट्रीय पक्षाने आपली निराळी काँग्रेस काढावी अशी कोणीतरी सूचना केली. तिचा परामर्श घेतांना टिळकांनीं पक्षोपपक्षांच्या ऐक्यासंबंधीचे सर्व तत्त्वज्ञान सांगितले आहे; त्याचा मथितार्थ असा.
 राष्ट्रसभा ही हिंदुस्थानांतील सर्व जातींची, पंथांची व पक्षांची आहे. तिचें स्वरूप ब्रिटिश पार्लमेंटसारखे आहे. पार्लमेंटांत जसे भिन्नभिन्न पक्ष नांदतात तसेंच आपण राष्ट्रसभेत नांदू दिले पाहिजेत. काँझरवेटिव्ह, लिबरल, लेबर, रॅडिकल असे अनेक पक्ष झाले तरी निराळे पार्लमेंट कोणी काढीत नाहींत. त्याच पार्लमेंटांत राहून तेथें आपापल्या पक्षाचे बहुमत करून घेण्यास हे पक्ष झटत असतात. आपल्याकडील राष्ट्रीय, नेमस्त इ. पक्षांनी हेंच धोरण अवलंबिले पाहिजे. अशा सभांचा निर्णय अर्थातच बहुमतानें होणें अवश्य आहे. आणि सभेचा निर्णय होईपर्यंत भिन्न पक्षांनीं कितीहि विरोधी भूमिका घेतल्या असल्या तरी एकदां निर्णय झाल्यावर तो आपलाच निर्णय असें समजून सर्वांनीं तो शिरोधार्य मानिला पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे कीं एकदां बहुमतानें निर्णय झाल्यावर सर्वच विचारस्वातंत्र्य संपते. तसें मुळींच नाहीं. बहुमत आपल्या बाजूस वळवून घेण्याचा प्रत्येक व्यक्तीस नेहमींच हक्क आहे. तो कधीहि कोणीहि हिरावून घेऊं शकत नाहीं. असा हक्क हिरावणें म्हणजे लोकांचें विचारस्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखे होय. आणि विचारस्वातंत्र्य हा तर राष्ट्राचा आत्मा होय. जेथें विचारस्वातंत्र्य नाहीं तें राष्ट्र मेल्यासारखेच होय, म्हणून हे स्वातंत्र्य नष्ट करूं पहाणारा मनुष्य राष्ट्राचा शत्रू समजला पाहिजे (केसरी २७-८-१९०७).
 राष्ट्रांत भिन्न पक्ष असणे हें घातक तर नाहींच पण अवश्यच आहे. त्यांवाचून प्रत्येक प्रश्नाचा सर्व बाजूंनीं विचार होणार नाहीं. मात्र भिन्नभिन्न