पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३०
भारतीय लोकसत्ता

चालना दिली आणि त्या मार्गानें सामाजिक व धार्मिक सुधारणांनाहि गति देण्याची व्यवस्था करून लोकसत्तेची जी अपूर्व सेवा केली तिकडे आपण दुर्लक्ष करणार असला तर आपल्यासारखे करंटे आपणच ! टिळकांना १९०८ सालीं शिक्षा झाली. त्या वेळी मुंबईत कामगारांचे दंगे झाले. कामगारांनी सहा दिवसपर्यंत संप केला आणि गोळीबारालाहि दाद न देतां तो चालू ठेवला. हे वृत्त रशियांतील कामगारचळवळींचा सूत्रधार निकोलाय लेनिन याच्या कानीं जातांच, "हिंदुस्थानांतील कामगारांचा हा पहिलाच राजकीय संग्राम असून तो उज्ज्वल भविष्यकाळाचा निदर्शक आहे म्हणून मी त्याचे स्वागत करतो" असे उद्गार त्याने काढले. टिळकांनी कोणची शक्ति जागृत केली होती हें आपल्याला कळले नाहीं तरी जाणत्यांनी हें त्या वेळीच जाणलें होतें.

जागृतीनंतर संघटना

 भरतभूमीतील लोकशक्ति टिळकांनी जागृत कशी केली हे येथवर आपण पाहिलें. आतां ती लोकशक्ति संघटित करण्याचे तितकेच महत्त्वाचे कार्य त्यांनी कसे केले ते पहावयाचे आहे. इतर देशांतील इतिहासावरून आपण पहातच आहों कीं, जागृत झालेली लोकशक्ति संघटित झाली नाहीं तर ती शक्ति त्या भूमीला वराप्रमाणे न ठरतां शापाप्रमाणे ठरते. संघटना कौशल्य नसल्यामुळे सध्यांच्या काळांत अनेक देशांतील जनता शतधा भिन्न होत आहे अगर दण्डसत्तेला शरण जात आहे असे दृश्य दृष्टीस पडते. हिंदुस्थानांत गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासांत असा प्रकार फारसा झाला नाहीं आणि याचें कारण म्हणजे टिळक व महात्माजी यांनी काँग्रेस ही संस्था अभंग राखण्याचे केलेले पराकाष्ठेचे प्रयत्न हें होय.
 देशांतल्या सर्व पक्षोपपक्षांचे बळ काँग्रेसमध्ये एकटवून तिला समर्थ करावयाचे, ती दुभंगू नये म्हणून व ती आपत्ति आलीच तर तिला सांधण्यासाठी पडेल ती किंमत द्यावयाची व जें पाऊल टाकावयाचें तें काँग्रेसला बरोबर घेऊन टाकावयाचे हे टिळकांचें जन्मभर ठरलेले धोरण होते आणि त्यांनी जन्मभर तें एकनिष्ठपणे पाळलें होतें. लोकशाहीच्या युगांत लोकायत्त संस्थामध्ये अखंड ऐक्य राखून समाजाची संघशक्ति अभंग