पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२९
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

विषमता ही जनता सहन करणार नाहीं. आज अस्पृष्ट जनतेची मागणी काय आहे ती पहा. देवळांत जाण्याचे व सहभोजनाचे हक्क यांचें महत्त्व आज त्यांना वाटत नाहीं. त्यांना राजकीय हक्क पाहिजे आहेत. व आपली आर्थिक स्थिति सुधारली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. या सुधारणा होतांच सामाजिक व धार्मिक बंधने तटातट् तुटून पडतील ही त्यांची खात्री आहे. टिळकांनी नेमके हेच तत्त्व प्रतिपादिले व अवलंबिले. व्यक्तित्व जागृत करणे हीच सर्वात श्रेष्ठ सामाजिक व धार्मिक सुधारणा होय. आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याकरतां वाटेल ते कष्ट व क्लेश भोगण्याची सिद्धता होणे येथूनच व्यक्तित्वाच्या जागृतीस प्रारंभ होतो. सर्व सुधारणांची ही गुरुकिल्ली जाणूनच टिळकांनी जनता जागृतीच्या कार्यास प्रारंभ केला होता. आतां ही जागृति करतांना सामाजिक सुधारणास विरोध करणे अवश्यच असतें असें नाहीं; पण तो काळ निराळा होता. सामाजिक सुधारणास जनतेचाच विरोध होता. तिचा पुरस्कार त्यांनी केला असतां तर ती आगरकरांवर उलटली तशी त्यांच्यावर उलटली असती. उलट राजकीय संग्रामासाठी ती लवकर सिद्ध होईल हे स्पष्ट होते आणि त्या संग्रामांतून तिचें व्यक्तित्व जागृत होऊन पुढे सामाजिक व धार्मिक सुधारणांना ती स्वयमेवच सिद्ध होईल हें टिळकांना दिसत होते आणि म्हणूनच त्यांनीं तो मार्ग पत्करिला. आतां सामाजिक सुधारणांना विरोध करतांना पुष्कळ वेळां आज आपणांस अप्रिय वाटणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या हे खरे आहे. संमतिवयाचा वाद त्यांनी करावयास नको होता हें खरे आहे. वेदोक्ताचा हक्क ब्राह्मणेतरांस नाकारावयास नको होता हें खरे आहे. आंतरजातीय विवाहाच्या बिलास त्यांनी विरोध केला नसता तर बरे झाले असते असे मलाहि वाटतें; पण आपला काल, आपली परिस्थिति व आपले संस्कार यांतून कार्लमार्क्ससारखा सर्वश्रेष्ठ क्रान्तिकारकहि मुक्त नसतो असे जेथे त्याचे अनुयायीच आज म्हणत आहेत तेथें टिळकांसारखा सनातन धर्माचा व पूर्वपरंपरांचा अभिमानी पुरुष कांहीं वेळां त्यांच्या आहारी गेला तर त्यांत नवल ते काय ? पण तेवढेच लक्षांत घेऊन, त्यांनी अखिल जनतेला राजकीय संग्रामाची दीक्षा देऊन तिच्या ठायींचा पृथगहंकार जागृत करून तिच्या व्यक्तित्वाच्या विकासाला जी
 भा. लो....९