पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२५
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

पंजाबातहि असंतोषाच्या ज्वाला भडकल्या. हा असंतोष लष्करापर्यंत पोचल्याची चिन्हे दिसूं लागली. तेव्हां लालाजींना १९०७ च्या मे महिन्यांत हद्दपार करण्यांत आलें. मद्रासमध्ये १९०७ च्या ऑगस्टमध्ये अर्काटला भरलेल्या प्रांतिक परिषदेत सुब्रह्मण्य अय्यर यांनी प्रतिकाराच्या याच मार्गाचा पुरस्कार केला.
 पण बहिष्कारयोगाची चळवळ अशी अखिल भारतव्यापी होऊं लागली असली तरी त्या केवळ पहिल्या लाटा होत्या. हे पाणी जमिनीच्या खालच्या थरांत अजून पोचलें नव्हतें. त्यामुळे टिळकांना शिक्षा होतांच सर्वत्र कोरड पडून चळवळीचे अवसान एकदम गेले. या चळवळीचा पुरस्कार करणारे प्रत्येक प्रांतांतले पुढारी पुढील सातआठ वर्षे कार्य करण्यास मोकळेच होते. कोणालाही अटक झाली नव्हती. पण त्यापैकी एकानेंहि ही चळवळ पुढे चालविली नाहीं. अरविंद घोष पाँडेचरीला अध्यात्मचिंतनासाठी निघून गेले. बिपिनचंद्र पॉल बरेचसे साम्राज्यनिष्ठ झाले. लजपतराय पुढील ८/१० वर्षात प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे इंग्लंड- अमेरिकेतच असत. केळकर- खाडिलकर महाराष्ट्रांत होते. सुब्रह्मण्य अय्यर मद्रासेंत होते. पण ते विशेष कांहीं करूं शकले नाहींत, सर्वात दुःखद कथा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची आहे. वास्तविक कायदेभंगाच्या चळवळीस प्रत्यक्ष प्रारंभ त्यांनीच केला होता. बारिसालनंतर पुन्हां त्या मार्गात त्यांनीं पाऊल टाकलें नाहीं. इतकेंच नव्हे तर १९२५ साली लिहिलेल्या आत्मचरित्रांत त्यांनी बहिष्कार योग, निःशस्त्र प्रतिकार यांचा अनेक ठिकाणी निषेध केला आहे. सनदशीर मार्ग सोडून आम्ही कधीं रेसभरहि गेलों नाहीं, असेंच त्यांचे म्हणणे आहे. एके ठिकाणीं आम्ही बारिसालला सत्याग्रह केला असे त्यांनी मान्य केले आहे, पण 'त्या वेळीं आम्हीं भोगलेलीं दुःखं आमची आम्हांस ठाऊक. पुन्हां त्या मार्गाने जाण्यांत अर्थ नाहीं.' असे त्याबद्दल सांगून टाकले आहे (ए नेशन इन दि मेकिंग पृ. २४०). १९१७ साली त्यांची ब्रिटिश साम्राज्यनिष्ठा वाढीस लागली व ते काँग्रेसमधून फुटून निघाले आणि १९२५ साली सनदशीर मार्ग सोडून रेखामात्र हि तुम्ही नाऊं नका, कारण ब्रिटिशांचे मन व धोरण आतां बदलले आहे, उदार झाले आहे, असा आपल्या देशबांधवांस त्यांनी शेवटचा संदेश दिला.