पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२६
भारतीय लोकसत्ता


अखिल भारतीय

 टिळक सुटून आले त्या वेळीं हिंदुस्थानच्या सर्व प्रांतांत असा अंधेर होता; तरी टिळकांची मंडालेची सहा वर्षे फुकट गेली असे म्हणण्याचें कारण नाहीं. ती सहा वर्षे टिळक जणुं काय इंद्रजिताप्रमाणे एकांतांत बसून अमोघ शक्तीच्या प्राप्तीसाठीं यज्ञ करीत होते आणि अप्रत्यक्षरीत्या कां होईना, प्रत्येक भारतीयाच्या मनांत त्या तेजाचा संचार होत होता. असे वाटण्याचे कारण हें कीं, टिळक सुटून आल्यानंतरच्या सहा वर्षांत येथे इतकी अपूर्व अशी लोकशक्ति जागृत झाली कीं, मागल्या तीन तपांच्या टिळकांच्या खडतर तपश्चर्येचे फल सिद्ध झाल्यासारखे वाटावें. १८८१ साली टिळकांनी या कार्यास प्रारंभ केला होता व १९१६ साली त्याला तीन तपें पुरीं होत होती. टिळकांच्या वयालाहि या सालीं ६० वर्षे होत असून ते आतां परिणतप्रज्ञ होऊन जनतेच्या अग्रभागी उभे होते. पुढील चार वर्षात लखनौ, कलकत्ता व अमृतसर येथे काँग्रेसची अधिवेशने झाली. चिकोडी, बेळगांव, अहमदाबाद, गोध्रा येथे प्रांतिक परिषदा झाल्या. या सर्व सभापरिषदांना टिळक गेलेच होते. त्याशिवाय सिंध, मद्रास, बंगाल या प्रांतांत त्यांचे दौरे निघाले होते. दिल्ली, कानपूर, अजमीर, अलाहाबाद अशा शहरी त्यांची व्याख्याने झाली. या सर्व सभांची, अधिवेशनांची व दौऱ्यांची हकीकत पाहिली कीं असें दिसतें कीं अखिल भारतीय जनता जागृत होऊन आतां या महापुरुषाच्या मागें उभी होती. कोट्यवधि लोकांनी त्यांना मानपत्रे दिली. त्यांत मुस्लीमसंघ, ब्राह्मणेतर पक्ष, मजूरसंघ यांचीहि मानपत्रे होतीं. हिंदी स्वराज्यसंघाच्या शाखा हिंदुस्थानच्या प्रत्येक गांवीं निघाल्या. अल्लीबंधूच्या अटकेसारख्या प्रसंगी दिल्लीपासून मद्रासेपर्यंत सभा होऊन सरकारचा निषेध होऊं लागला आणि होमरूलच्या मागणीसाठी ॲनी बेझंट यांना अटक होतांच हिंदुस्थानांतल्या सर्व प्रांतांतील लोकांनीं, 'ती मागणी बेकायदेशीर असली तर आम्ही तीच जाहीरपणे करीत आहों, व त्यासाठी होईल ती शिक्षा भोगण्यास सिद्ध आहो' असा घोष शेकडों जाहीर सभांतून केला व तशी लेखी प्रतिज्ञापत्रकेहि दिली. अशा रीतीने चाळीस वर्षांच्या दीर्घ परिश्रमानें टिळकांनी अखिलभारतीय जनतेची प्रतिकारशक्ति जागृत केली,