पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२४
भारतीय लोकसत्ता

बहिष्कारयोगाचे तत्त्वज्ञान पसरविण्याचे जे कार्य टिळकांनीं आरंभिले होते, त्यांत मात्र त्यांना इतर प्रांतांतील धुरीणांचे पुष्कळच साह्य झाले. पहिल्या चळवळीचे पडसाद महाराष्ट्राबाहेर इतर प्रांतांत कोठेच उमटले नाहींत. पण वंगभंगाच्या निमित्तानें निर्माण झालेली प्रक्षोभाची लाट मात्र एकदम सर्व हिंदुस्थानभर पसरली आणि स्वदेशी बहिष्काराच्या चळवळीला एकदम अखिल भारतीय रूप प्राप्त झाले. प्रत्यक्ष कायदेभंग व करबंदी येथपर्यंत ही चळवळ गेली नाहीं. पण वंगभंगाच्या अन्यायाचा प्रतिकार केवळ अर्ज- विनंत्यांनीं न करतां ब्रिटिश मालावर बहिष्कार घालून करावयाचा, या पायरीवर मात्र भारतांतील सर्व प्रांतांतले लोक एकदम चढले. कायदेभंगाचा एकच प्रसंग त्या वेळी झाला आणि तो म्हणजे वारिसालचा; आणि त्याचे सर्व श्रेय बाबू सुरेंद्रनाथ बॅनर्जी व त्यांचे सहकारी यांनाच आहे. टिळकांनी त्यांच्या या अपूर्व राष्ट्रसेवेबद्दल केसरींतून त्यांच्यावर धन्यवादाचा नुसता वर्षाव केलेला दिसतो. कारण त्या एका दिवसाच्या त्या एका प्रहरांत सुरेंद्रनाथांनी भारतांतील राजकीय चळवळीचा सगळा मोहराच पालटून टाकला होता. बंगालमधील राष्ट्रीय पक्षाचे धुरीण बाबू बिपिन चंद्रपाल व बाबू अरविंद घोष यांनी बहिष्कारयोग किंवा निःशस्त्र प्रतिकार या मार्गाचा फारच जोराने पुरस्कार केला. अरविंद घोषांनीं आपल्या अलौकिक, त्यागमय, साहसी व तेजस्वी जीवनाने बंगालचे वातावरण विजेच्या स्फुल्लिंगांनी भरून टाकले. पंजाबमध्ये लाला लजपतराय यांनीं निःशस्त्र प्रतिकाराच्या मार्गास अशीच चालना दिली. १६-१०-१९०५ या दिवशी त्यांचे भाषण झाले, तें अतिशयच तेजस्वी असे होते. 'सर्व हिंदुस्थानांत बंगाल अग्रेसर असून तो या जुलमाने जागृत झाला आहे. आपल्या राष्ट्राच्या चळवळीची धुरा वाहण्याचा अग्रमान बंगालने मिळविला, याचा मला हेवा वाटतो. आपल्या राष्ट्राला हा पुण्ययोग आणून दिल्याबद्दल आपण कर्झनसाहेबांचे आभार मानले पाहिजेत. ब्रिटिशांनी असे व्हाइसरॉय वरचेवर पाठवावे अशी माझी मागणी आहे. इंग्लिश राष्ट्राच्या इतिहासाचा संदेश मी तुम्हांस सांगतों. निःशस्त्र प्रतिकार हाच तो संदेश होय. तुम्ही अधिक पौरुष दाखवा, अधिक कणखर व्हा म्हणजे आपले ध्येय सहन साध्य होईल' (लजपतराय दि मॅन इन् हिज् वर्डस्. पृ. १४९). यानंतर बंगालप्रमाणेंच