पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२३
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

त्यापेक्षांहि प्रभावी शस्त्र आहे. प्रत्यक्ष प्रतिकार करतां येत नाहीं; पण परकी सरकारला आपल्यावर राज्य चालविण्यास साह्य करावयाचे नाहीं ही प्रतिज्ञा तर तुम्हांला करतां येईल ना ? बहिष्कार हें राजकीय शस्त्र आहे असे आम्ही म्हणतों, तेव्हां आमच्या मनांत हा अर्थ असतो. करवसुली, न्यायदान, पोलीस, यापैकी कोणच्याहि खात्यांत सरकारला साह्य करू नका. हिंदुस्थानाबाहेर लढाई चालविण्यास साह्य करूं नका. आपण आपलीं न्यायालयें स्थापूं. आपण आपला कारभार करूं. आणि तशी वेळ येतांच आपण कर बंद करूं. आपल्या संघशक्तीनें आपण हे घडवून आणूं, असा तुम्हांस आत्मविश्वास असेल तर तुम्ही उद्यांपासून स्वतंत्रच आहां.' (कलकत्त्याचे २-१-९९०७ चे भाषण.)
 भारतीय लोकसत्तेच्या प्रस्थापनेत लो. टिळकांचे कार्य काय ते आपण पहात आहो. भारतीय जनतेत अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ति जागृत करून लोकसत्ता पेलण्यास अवश्य अशी जी लोकशक्ति ती टिळकांनी चाळीस वर्षांच्या दीर्घं परिश्रमांनीं निर्माण केली, अशी एका वाक्यांत त्यांच्या कार्याची फलश्रुति सांगतां येईल. आतां या जागृतीसाठी टिळकांनीं ज्या चळवळी केल्या त्यांना अखिल भारतीय रूप करें प्राप्त झाले ते प्रथम पाहून नंतर या जागृत लोकशक्तीची टिळकांनी संघटना कशी केली त्याचा विचार करून हे प्रकरण संपवू.
 कायदेशीर चळवळ व कायदेभंगाची चळवळ असे टिळकांच्या चळवळीचें दोन भाग पडतात. १८९१-९२ सालापासून व विशेषतः १८९६ सालापासून १९०३ पर्यंत महाराष्ट्रांत टिळकांनी कायदेशीर संग्राम चालविला होता. त्या वेळी इतर प्रांतांत असल्या तऱ्हेची सौम्य चळवळसुद्धां चालू नव्हती. अर्जविनंत्यापलीकडे काँग्रेसची मजल गेली नव्हती. जनता तर निपचीप जमिनीसरपट पडून होती. १९०३ च्या सुमारास कायदेशीर चळवळीच्या मर्यादा संपल्या, हे जाणून टिळकांनीं निःशस्त्रप्रतिकार, बहिष्कार- योग, कायदेभंग यांचे तत्त्वज्ञान प्रतिपादण्यास प्रारंभ केला. या दुसऱ्या प्रकारची चळवळ टिळकांनीं प्रत्यक्ष अशीं कधींच केली नाहीं. तिचं तत्त्वज्ञान सांगून जनतेची मनोभूमिका तयार करीत असतांनाच त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली, आणि हे नवें तेज क्षणभर मालवल्यासारखे झाले. पण