पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२२
भारतीय लोकसत्ता

प्रक्रियेने आपले कृत्य कायदेशीर ठरवितां येते; प्रजेलाहि दुसऱ्या एका प्रक्रियेने ते कृत्य जुलमी ठरवितां येतें. त्या कायदेशीर पण जुलमी हुकमाचा शांततेनें, हालअपेष्टा सोसून, व अवश्य तर स्वतःचा बळी देऊन प्रतिकार करणे हीच ती प्रक्रिया होय. (१५ मे १९०६) बंगाली नेत्यानीं नेमके हेच केलें. हालअपेष्टांच्या भट्टींतून याप्रमाणे जाणे हा इंग्रजी राष्ट्राचा प्रघात आहे. त्याचेच अनुकरण करून पोलीसांच्या दंडुक्यानी डोकी फोडून घेऊन 'दुःख सोसण्यास आम्ही तयार आहो' असे जाहीर करण्याचा विधि बंगाली पुढाऱ्यांनी ऐतिहासिक रीतीने पार पाडला. आणि जुलमी कायद्यांना प्रतिकार करण्याचे सामर्थ्य प्रजाननांत आहे हे त्यांनी सिद्ध केलें. अशा प्रकारच्या शांततेच्या आग्रहाखेरीज आतां कार्यभाग व्हावयाचा नाहीं. या मार्गालाच इंग्रजीत पॅसिव्ह रेझिस्टनस् असे म्हणतात. (१०-७-१९०६)
 तेव्हां यापुढे कोणाचीहि चळवळ करतांना न्याय, नीति आणि ऐतिहासिक परंपरा किंवा प्रगति यांचा आमच्या कृत्यास आधार आहे कीं नाहीं एवढेच आम्ही पाहिले पाहिजे. ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे याचा विचार करण्यांत हंशील नाहीं. प्रजेच्या नैसर्गिक हक्कांस धरून नीतिदृष्ट्या एखादे कृत्य योग्य ठरल्यावर तें कायद्याचें कक्षेत येतें कीं नाहीं याची पर्वा करून उपयोगी नाहीं. आतां येवढे खरे की कायदा मोडला की शिक्षा होणार. पण त्याला इलाज नाहीं. कायदा एकदां जुलमी ठरल्यावर शिक्षा सोसूनच त्याचा प्रतिकार केला पाहिजे. नीति व कायदा यांची फारकत होते तेव्हां असेच प्रकार घडून येतात (१२-२-१९०७).
  टिळकांचे कायदेभंगाचे तत्त्वज्ञान शक्य तो त्यांच्याच शब्दांत वर दिले आहे. हिंदुस्थानांत लोकसत्ता निर्माण व्हावयाची व टिकावयाची तर सामान्य जनतेला अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले पाहिजे हा सिद्धांत त्यांच्या मनाशी दृढ होऊन गेला होता. तो प्रतिकार कायद्याच्या कक्षेत राहून करावयाचा नसून कायदा जेव्हां जुलमी असेल तेव्हां त्याचा भंग करून केला पाहिजे ही शिकवण त्यांनी कशी दिली, हें वरील अवतरणांवरून स्पष्ट होईल. आरंभी उल्लेखिलेल्या कलकत्त्याच्या भाषणांत त्यांनीं आपल्या बहिष्कार योगाचे किंवा असहकारितेचें सर्व शास्त्र अगदी थोडक्यांत सांगितले आहे. आपल्याजवळ शस्त्रास्त्रे नाहीत; पण त्यांची जरूरहि नाहीं. बहिष्कार हें