पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२०
भारतीय लोकसत्ता

मराठ्यांत सारखे लेख लिहून या प्रक्षोभाचे लोण ते पंजाब, मद्रास, संयुक्त प्रांत इ. प्रांतांतून पोचवीत राहिले. या प्रसंगानें हिंदुस्थानच्या राजकीय चळवळीला टिळकांना कोणचे वळण लावावयाचे होते ते पुढील अवतरणांवरून दिसून येईल. 'शंभरांपेक्षां अधिक वर्षांच्या शिक्षणाने बंगाली लोक इंग्रजी रीतीची चळवळ करण्यास शिकले आहेत व त्यांनीं जर संघशक्ति अशीच कायम ठेवली तर त्यांच्या चळवळीस जोर मिळून तिचा पगडा सरकारवरहि बसण्याचा संभव आहे' (१५-८-१९०५). 'प्रजा कितीहि दुबळी असली तरी जुटीने व निश्चयाने ती अरेरावी राज्यकर्त्यास शस्त्रावीणहि भारी होते ही गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे.' (२२-८-५) 'प्रजेचा निग्रह आणि संप यांची शक्ति कांहीं सामान्य नाहीं. रशियाचे झार अधिक जुलमी. पण रशियांतील प्रोफेसरांनी, विद्यार्थ्यांनीं, मजुरांनी, कारखानदारांनी, एडिटरांनी, दुकानदारांनी, आपले मागणे नेटाने व धैर्याने कशाचीहि परवां न करतां, जेव्हां झारसाहेबापुढे मांडलें, तेव्हां जगांतील सर्व बादशहांत प्रबळ असे हे बादशहा मट्ट्यास आले. हिंदुस्थानांतहि अशी लढाई जुंपण्याची चिन्हें दिसूं लागलीं आहेत (२८-११-१९०५).
 ही चळवळ इंग्रजी रीतीने करावयाची आहे, म्हणजे प्रजा ही शक्ति तेथें जागृत करावयाची आहे, आणि ही शक्ति इतकी प्रभावी आहे की तिच्यापुढे कोणचाहि मदोन्मत्त राजा टिकू शकणार नाही, हाच या सर्वांचा मथितार्थ आहे.
 वंगभंगाच्या प्रतिकारार्थ स्वदेशी बहिष्काराची चळवळ चालू असतांना तिच्यांतूनच पुढील सालीं वारिसाल प्रकरण उद्भवले आणि या प्रकरणांत बंगाली धुरीणांनी धैर्यानें एक पाऊल पुढे टाकून हिंदुस्थानांतील कायदे- भंगाच्या चळवळींचा पहिला मंत्र म्हटला. रस्त्याने मिरवणुकी काढावयाच्या नाहींत व वंदे मातरम् गीत म्हणावयाचे नाहीं, असें जुलमी आज्ञापत्र सरकारने काढले होते. १४ एप्रिल १९०६ रोजी बारिसाल येथे भरणाऱ्या बंगाल प्रांतिक परिषदेसाठी जमलेल्या बंगाली नेत्यांनी या निर्बंधाचा भंग करावयाचा असे ठरविले व त्याप्रमाणे मोठी मिरवणूक काढून ते मंडपाकडे निघाले. पोलीस लाठीहल्ला करतील ही त्यांना कल्पना होती. तरी हा भंग करावयाचाच असें ठरवून वंदेमातरम् चा घोष करीत मिरवणूक निघाली.