पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११९
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

वर्षे, राजकीय चळवळीची दिशा पालटली पाहिजे, जुन्या अर्जविनंतीच्या मार्गाने कांहीं एक मिळणार नाहीं, हे प्रतिपादन त्यांनी सारखे चालू ठेविलं होते. 'कायदेशीर चळवळ फलद्रूप होत नसेल तर दुसरा मार्ग काढला पाहिजे' (२९-१२-१९०३), 'सरकारच्या जुलमाखालीं तुम्ही मरत असाल तर तो दोष तुमचा आहे, सरकारचा नाहीं. राज्यपद्धति असह्य झाली असेल तर आपल्या वर्तनाने तसे दाखवा व इंग्रजांस सळो की पळो करून टाका.' 'पाश्चिमात्य देशांप्रमाणे हिंदुस्थानांतील लोक एकराष्ट्रीयत्वाच्या कल्पनेने प्रेरित होऊन आपल्या हक्कासाठी एकीने भांडणारे असते तर हिंदुस्थानावर इंग्रजांचें राज्यच झाले नसते' अशा तऱ्हेची प्रक्षोभक प्रेरणा ते सारखे देत होते. त्यामुळे कायदेभंगाची भूमिका तयार होत आली होती आणि वंगभंगाचा जुलमी प्रसंग येतांच टिळकांनी त्या कारणानें प्रक्षुब्ध झालेल्या भारतीयांच्या भावनांचा ओघ बहिष्कारयोग अथवा निःशस्त्र प्रतिकार या मार्गाकडे वळविला.
 वंगभंगाची घोषणा सरकारने २० जुलै १९०५ या दिवशी केली. ती ऐकून सर्व बंगाल अगदीं संतप्त झाला व बाल- वृद्ध, गरीब- श्रीमंत, हिंदु- मुसलमान, ग्रामीण- नागर, सर्व वंगीय जनता या सुलतानीच्या प्रतिकारार्थ सिद्ध झाली. प्रतिकाराचे स्वरूप निश्चित करण्यासाठीं प्रारंभी ज्या सभा झाल्या त्यांत सुरेंद्रनाथ बॅनर्जी, शचींद्रप्रसाद बोस, कृष्णकुमार मित्र, मोतिलाल घोष इ. बंगाली धुरीणांनीं हें निश्चित ठरविलें कीं, यावेळी नुसत्या सभा, अर्ज, विनंत्या, शिष्टमंडळे यांवर विसंबून रहावयाचें नाहीं. या द्वाराने प्रगट झालेल्या लोकमताचा कर्झन पदोपदी अवमान करीत होता. तेव्हां पुन्हां त्यांचाच अवलंब करण्यांत अर्थ नाहीं. यांपेक्षां जास्त प्रभावी उपाययोजना आतां केली पाहिजे. असें ठरवून त्यांनीं स्वदेशी व बहिष्कार हें दुधारी शस्त्र हातीं घेण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे ७ ऑगस्टला कलकत्त्याला सभा भरवून प्रचाराला व चळवळीला सुरुवात केली.
 अर्जविनंत्यांच्या पलीकडे आपण गेले पाहिजे, सरकारी राज्ययंत्र अडवून पाडले पाहिजे, त्यावांचून तरणोपाय नाहीं, हा घोष टिळकांनी गेलीं तीनचार वर्षे चालवलाच होता. बंगाली पुढाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने तोच निश्चय केल्याचे पाहून टिळकांना अत्यंत समाधान वाटले आणि १५ ऑगष्टपासून केसरी-