पान:भारतीय लोकसत्ता.pdf/११७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११६
भारतीय लोकसत्ता

जुलमी राजसत्ता नष्ट झाल्यानंतर लोकसत्ता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले, पण ते मुळींच सफल झाले नाहींत. कारण तेथे लोकसत्ता फक्त बाह्यरूपांतच आली होती. जनता ही शक्ति जागृत व संघटित करण्याचा त्या देशांत कोणी कधीच प्रयत्न केला नव्हता. तो प्रयत्न टिळकांनी या भूमींत केला. इतर देशांतल्या नेत्यांप्रमाणे ५७ सालच्या रीतीनेच त्यांनीं येथें पुन्हां उठावणी केली असती, त्या वेळीं ज्या सरदार जमीनदार संस्थानिकांनी आपले वैभव गेले म्हणून संग्राम पुकारला त्यांच्याच वारसांची व वर्गीयांची टिळकांनी संघटना करून पुन्हां बंड पुकारले असतें, तर कदाचित् यशस्वी होऊन या भूमीला स्वातंत्र्याची प्राप्ति झालीहि असती; पण मग आपण स्वातंत्र्यानंतर जुन्या सरंजामी युगांतच राहिलो असतो. आज या देशांतली सरंजामशाही समूळ नष्ट झाली आहे. जुनें युग अस्त पावले आहे आणि नव्या युगाचा उदय झाला आहे. या उदयाचे कारण एकच आहे. जनता प्रतिकारक्षम झाली आहे, तिला आपल्या हक्काची जाणीव होऊन आत्मसामर्थ्याचा प्रत्यय आला आहे, हे ते कारण होय. जो प्रतिगामी आहे, ज्याला जुनेंच टिकवावयाचे आहे, तो जनतेची शक्ति जागृत करण्याचा कधीहि प्रयत्न करणार नाहीं. चीनमधील चिआंग कै शेकचें उदाहरण आपल्या डोळ्यांपुढेच आहे. त्यानें पाश्चात्य भांडवलदारांचें साह्य घेतलें, आक्रमण करून येणाऱ्या जपानशीं संगनमत केलें, आपल्या भूमीची शकलें होण्याचा धोकाहि पत्करला, पण चिनी जनतेची संघटना करण्याचे मनांतहि आणले नाहीं. एवढेच नव्हे तर तिने आपण होऊन दिलेले साह्य घेण्याचेहि नाकारले आणि इकडे जपानशीं युद्ध चालू असतांना स्वतःच्या जनतेवरच त्यानें हत्यार धरले. त्याला एकच भीति होती. जनता जागृत होईल ही ती भीति होय. ते टळावे म्हणून त्याने वाटेल ते अनर्थ पत्करले व शेवटी आपला सर्वनाश करून घेतला. आणि जी गोष्ट टळावी म्हणून चिआंग आपले शक्तिसर्वस्व खर्च करीत होता तीच गोष्ट भरतभूमींत घडवून आणण्यासाठी टिळकांनी आपले शक्तिसर्वस्व अर्पण केलें होतें. नवशक्तीची ही ज्योत त्यांनी निर्माण केली असतांना, त्यांची सनातन धर्मांवरील निष्ठा, त्यांचे जुन्या आचारावरील प्रेम, त्यांनीं संस्थानिक, सावकार, मामलेदार यांचा ब्रिटिशांविरुद्ध पक्ष घेऊन (जनतेविरुद्ध नव्हे) त्यांचे