पान:भारतीय लोकसत्ता.pdf/११८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११७
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

केलेले समर्थन, असल्या गोष्टीकडे बोट दाखवून त्यांना जे प्रतिगामी म्हणतात त्यांनीं तारतम्य शब्दाचा अर्थ समजावून घेण्यांत एक जन्म घालविणें अवश्य आहे.
 जनता ही शक्ति जागृत करण्यासाठी टिळकांनी कायदेशीर संग्राम करून पहिल्या पंचवीस वर्षात कोणचे प्रयत्न केले ते आपण पाहिले. आतां निःशस्त्र प्रतिकार, कायदेभंग किंवा बहिष्कार हा जो जनता जागृतीचा प्रभावी मार्ग त्या मार्गाचा अवलंब करून त्यांनी भारतीय जनतेची प्रतिकारशक्ति कशी चेतविली ते आपणांस पाहावयाचे आहे.

बहिष्कार- योग

 या मार्गास टिळकांनी स्वतः 'बहिष्कार- योग' असें नांव दिले होते. बहिष्कार या शब्दाने फक्त विदेशी मालावरील बहिष्कार असा अर्थ आपल्या मनांत येतो. टिळकांची विवक्षा इतकी संकुचित नव्हती. ब्रिटिश लोक अगदीं अल्पसंख्य आहेत. येथल्या तीस कोटी लोकांवर केवळ दोनतीन लक्ष लोकच राज्य करीत असतात. इतक्या अल्पसंख्यांचें राज्य एवढ्या बहुसंख्येवर चालतें याचें कारण असें कीं हे जुलमी राज्य चालविण्यास ते बहुसंख्य लोकच सर्वतोपरी साह्य करीत असतात. त्यावांचून हें राज्य चालणें शक्य नाहीं. सरकार ब्रिटिश असले तरी त्याच्या प्रत्येक खात्याचा कारभार हिंदी लोकच चालवितात. पोस्ट, रेल्वे, सेक्रेटरिएट, जमाबंदी ही सर्व खातीं आम्हीच चालवितों. पोलीस खात्यांत बहुसंख्या आमचीच आहे. न्यायखातें आमच्या लोकांनीच भरले आहे. हा सर्व व्यवहार नीट चालावा म्हणून कराच्या रूपाने पैसा आम्हीच देतो आणि राज्यव्यवस्थेत कोठे बिघाड झाला तर बंडखोरांना शासन करणारें जें सैन्य त्यांत बहुसंख्येनें आमचेच लोक आहेत. तेव्हां सरकारचा सर्व कारभार, इतकेंच नव्हे तर सरकारचा श्वासोच्छ्वासहि आम्हीं चालविला आहे. या सर्व कारभारावर आम्हीं जर बहिष्कार घातला तर हें सरकार एका क्षणांत कोसळून पडेल आणि त्या क्षणींच आपण स्वतंत्र होऊं. बहिष्कार या शब्दाचा इतका व्यापक अर्थ टिळकांच्या मनांत होता. आणि हें राजकीय शस्त्र, देशाची खरी शक्ति ते जागृत करीत असल्यामुळे तोफा-बंदुकापेक्षांहि जास्त प्रभावी आहे असे त्यांचे निश्चित मत