पान:भारतीय लोकसत्ता.pdf/११६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११५
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

सर्व तत्त्वज्ञान त्यांनी या भूमीत कसे पसरून दिले होते, ते या उत्तरार्धात प्रथम पहावयाचे आहे आणि त्यानंतर या प्रक्षोभानें जागृत झालेले लोकमत संघटित करून कार्यकप्रवण करण्याची विद्या म्हणजेच लोकसत्तेच्या यशाची जी राजविद्या त्यांनी जनतेला शिकविली तिचें सम्यक् ज्ञान करून घ्यावयाचें आहे.

सुप्त शक्तीला आवाहन

 अन्याय, जुलूम, आक्रमण यांचा प्रतिकार करण्याची शक्ति असणें हें कोणच्याहि समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण होय आणि त्यामुळे ही शक्ति जो जागृत करील तो समाजाचा सर्वांत मोठा हितकर्ता ठरतो. मागल्या काळीं सामान्य जनतेच्या अंगीं अशी प्रतिकारशक्ति बहुधा कधीं निर्माण झालेली नसे. परकीयांचे आक्रमण आले तर ते मोडून काढण्याची जबाबदारी राजेलोकांवरच असे आणि ते ती पार पाडण्यास असमर्थ ठरले तर ती भूमी परकीयांच्या आहारी जात असे. स्वकीय राजाचा जुलूम झाला तरीसुद्धां त्याचा प्रतिकार सरदार, जमीनदार हेच करीत. अखिल जनतेनें जागृत होऊन राजाला वठणीवर आणल्याची उदाहरणें मागल्या इतिहासांत अपवादात्मकच आहेत. हिंदुस्थानचा मागला इतिहास असाच आहे. परकीयांचे आक्रमण मोडून काढणारे, किंवा स्वकीय राजांच्या जुलमाला पायबंद घालणारे जे वीरपुरुष त्यांना जनतेचे साह्यच मिळाले नाहीं असे नाहीं, पण त्यांच्या सैन्यांत दाखल होऊन त्यांची मनोभावें सेवा करण्यापलीकडे जनतेनें या भूमींत जास्त कर्तबगारी कधींच कांहीं केलेली नाहीं. अशा या भरतभूमींत सरदार, जमीनदार, संस्थानिक यांच्या साह्याची व नेतृत्वाची कसलीहि अपेक्षा न ठेवतां, इतकेंच नव्हे तर त्यांचा संबंधहि न येऊ देतां लो. टिळकांनीं सामान्यजनतेची सुप्त प्रतिकारशक्ति जागृत केली, अन्यायाला तोंड देण्याचे धैर्य तिच्या ठायीं निर्माण केले व या शक्तीची संघटना करून ब्रिटिशांच्या विरुद्ध तिला संग्रामांत उभे केलें, हीच त्यांनीं केलेली लोकसत्तेची अत्यंत मोठी सेवा होय. ही पूर्वतयारी झाल्यावांचून लोकसत्ता कधींहि यशस्वी होत नाहीं. पोलंड, जर्मनी, इटली, झेकोस्लोव्हाकिया, मेक्सिको, चनि या देशांत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर किंवा