पान:भारतीय लोकसत्ता.pdf/११५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११४
भारतीय लोकसत्ता

येऊन धडकला आहे असे आम्ही मानावें, असा लेली साहेबाच्या म्हणण्याचा खरा अर्थ आहे (६-१०-१५०३). हें व या तऱ्हेचें ज्ञान व विचार केसरींतून सतत दहाबारा वर्षे टिळक लोकसमूहांत पसरून देऊन येथील जनतेच्या अंगचें चैतन्य जागृत करून तिच्या अंगच्या सुप्त शक्तींना जागृति आणीत होते आणि तिला 'अन्यायाचा प्रतिकार' हा लोकसत्तेचा पहिला पाठ देत होते.
 हिंदुस्थान हा देश प्रामुख्याने शेतकऱ्यांचा आहे.टिळकांनी लोकजागृतीच्या कार्यास प्रारंभ केल्याला आतां पन्नासच्या वर वर्षे होऊन गेलीं. आजहि जवळ जवळ तीच स्थिति आहे. या मधल्या अवधींत येथे कामगारांचा- शहरी कामगारांचा- वर्ग निर्माण झाला आहे; पण अजूनहि तुलनेने पाहतां तो फार लहान आहे. बहुसंख्य जनता अजून शेतीवरच अवलंबून आहे. तेव्हां देशांत खरी 'लोक' सत्ता प्रस्थापित व्हावयाची व ती यशस्वी व्हावयाची तर हे 'लोक', ही जनता, म्हणजे हे किसान सुबुद्ध, कार्यक्षम, समंजस व समर्थ होणे अवश्य आहे. देशाला स्वतंत्र करण्याचें व सार्वभौम सत्ता लोकांच्या हातीं आणून देण्याचे सामर्थ्य जनतेलाच आहे. १८८० च्या सुमारास, आपल्या सार्वजनिक आयुःक्रमाच्या प्रारंभी वयाच्या पंचविसाव्या वर्षीच टिळकांनी हे जाणले होते. त्यांचा तसा बुद्धिनिश्चय झाला होता. पुढील पंचवीस वर्षांत हा ध्रुवतारा डोळ्यापुढे ठेवून त्या दिशेने त्यांनी मार्गक्रमण कसे केलें हें आतांपर्यंत आपण पाहिले. आपल्या भूमीला स्वातंत्र्य मिळवावयाचे ते लोकांकरितांच मिळवावयाचे व तें लोकशक्तीच्या साह्यानेंच मिळवावयाचे हे तत्त्व त्यांनी तेव्हांपासून अवलंबिले होतें. पूर्वेकडच्या दीर्घकाल पारतंत्र्यांत खितपत पडलेल्या इतर अनेक देशांहून आपल्या देशाचा इतिहास जो कांहींसा निराळा झाला आहे, लोकायत्त शासन प्रारंभापासूनच यशस्वी होण्याचा जो कांहीं थोडा संभव येथे निर्माण झाला आहे त्याचे श्रेय या तत्त्वाला आहे, हे येथपर्यंतच्या विवेचनावरून ध्यानांत येईलसें वाटतें. टिळकांच्या कार्याचा पूर्वार्ध येथे संपला. आतां उत्तरार्धांचे विवेचन करावयाचे आहे. कायदेशीर संग्रामाचा प्रयोग दहाबारा वर्षे केल्यानंतर कायदेभंगाच्या मोहिमेच्या तयारीस ते कसे लागले आणि १९०८ सालीं तुरुंगांत जाण्यापूर्वीच या दुसऱ्या लढ्याचें