पान:भारतीय लोकसत्ता.pdf/११३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११२
भारतीय लोकसत्ता

पुढारी लोकांस अद्यापि शिकावयाची आहे. ती जेव्हां तें शिकतील तेव्हांच सरकारी अधिकाऱ्यांचा उर्मटपणा उतरेल.'
 अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ति प्रत्येक नागरिकाच्या अंगी बाणविणें हा लोकायत्त शासनाचा पहिला धडा होय. या वृत्तीवांचून लोकसत्ता कधींहि टिकावयाची नाहीं. इतर देशांत सरदार, भांडवलदार हे लोक राजसत्तेशी झगडले, पण ते स्वतःच्या स्वार्थासाठी. मध्यम वर्गातील क्रांतिकारक जनतेसाठी दहशतवादी चळवळी करीत; पण त्यांतून खरी जनशक्ति निर्माण होणे शक्य नव्हतें. आपल्या हक्कांची जाणीव होऊन स्वतः रयतच जेव्हां प्रतिकारार्थ उभी ठाकते त्या वेळीं स्वातंत्र्य व लोकसत्ता प्राप्त करून देणारी व ती टिकविणारी शक्ति निर्माण होते, हें ध्यानीं घेऊनच टिळकांनीं ही अमोघ शक्ति जागृत करण्याचा दृढनिश्चय केला होता. कायदेशीर संग्राम हा चळवळीचा पहिला टप्पा होता. पुढील कायदेभंग व करबंदी या मोहिमांची ती पूर्वतयारी होती. कारण सरकारने प्रजेच्या हिताचे कागदावर जरी कायदे केले होते तरी वास्तविक ती धूळफेक होती. प्रजेला त्या कायद्यांचा फायदा मिळावा अशी सरकारची मुळींच इच्छा नव्हती. आंतून सरकारी अधिकाऱ्यांना निराळ्याच सूचना असत. आंतले कायदे निराळेच असत. त्यामुळे बाह्यतः कायदेशीर दिसणारी ही मोहीम वस्तुतः कायदेभंगाचीच मोहीम होती. तेथल्या मामलेदाराने वा कलेक्टराने सरकारच्या अंतःस्थ पाठिंब्याने जारी केलेला कायदा मोडावयास शिकविणें हेंच टिळकांचें धोरण होते. १८९९ सालीं सारा वाढीसाठी जी फेरपहाणी झाली तिच्या कामांत सर्व्हे अधिकाऱ्यांनी लँड रेव्हिन्यू कोड धुडकावून देऊन मनमानेल तसा सारा वाढविला होता. या अन्यायाला टिळकांनीं वाचा फोडली. (केसरी २४-१०-९९) म्हणजे सरकारी अधिकारी फॅमिन रिलीफ कोड धाब्यावर बसवीत, लँड रेव्हिन्यू कोड धुडकावून लावीत आणि निराळाच कायदा जारी करीत. या कायद्यांचा भंग करण्यास टिळकांनी जनतेला शिकवून तिचे प्रतिकारसामर्थ्य जागृत केले. १९०३ पर्यंत दुष्काळी व्यवस्थेतील अनास्था व जुलूम यांखेरीज, सारावाढ आणि शेतकऱ्यांचा जमिनीवरील हक्क नष्ट करणे ही दोन आणखी दडपशाहीची कृत्ये सरकारने केली. या प्रत्येक वेळीं केसरीच्या द्वारां गर्जना करून टिळकांनी शेतकऱ्यांना हांक दिली आणि,