पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
भारतीय लोकसत्ता

पांच पन्नास व्यासपीठें मांडून राजकीय चळवळीचा लोकांत प्रसार करावा. आपली खरी स्थिति काय आहे, सरकार कसा जुलूम करीत आहे त्याचे ज्ञान अशा प्रसंगाने सुशिक्षितांनी लोकसमूहाला करून द्यावे. असे केले तरच आपल्या राजकीय चळवळीचा प्रवेश खेड्यांतील झोपडींत होईल. तेव्हां 'आपण शिकलेले' ही ऐट न करतां सुशिक्षितांनी लोकांत मिसळण्याची ही संधि साधावी असा उपदेश त्यांनी केला आहे. (केसरी ८-९-९६)
 १८९६ सालापर्यंत शेतकऱ्यांवर जुलूम होईल, त्यांचे दारिद्र्य वाढेल, व त्यांच्या द्रव्याचा अपहार होईल असे अनेक प्रकार घडले. त्या प्रत्येकाची केसरींतून चर्चा करून या अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे अशी चेतवणी टिळक देत होते. १८९३ साली चांदीची व रुपयाची सरकारने फारखत केली. यामुळे दर दहा रुपयामागें शेतकऱ्याचे दोन रुपयांचे नुकसान होऊन त्याचे कोट्यवधि रुपये कसे गेले, हे केसरीने स्पष्ट करून दाखविलें. ही फारकत सरकारने कशासाठी केली होती ? तर काही बड्या कामगारांना आपले पैसे विलायतेस पाठविणे सोपे जावें म्हणून ! (केसरी ४-७-९३) १८९५ साली मँचेस्टरच्या कापडावरचा कर सरकारने कमी केला. ५० लक्षांची सूट त्यांना मिळाली आणि येथल्या जाडी कापडावर कर बसविल्यामुळे जनतेचे ११ लक्ष रुपये गेले. यामुळे येथला कोष्टी मरत आहे असे सांगून केसरीने असे बजावलें आहे कीं, 'अमेरिकेत क्रान्ति झाली ती असल्याच अन्यायामुळे झाली. आतां आम्हांस अमेरिकेसारखा प्रकार करावयाचा नाहीं हें निराळे. पण या अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे. येथला राज्यकारभार मँचेस्टरवाल्यांच्या हितासाठी चालला आहे. तेव्हां आपणहि प्रतिकार म्हणून स्वदेशी व्रत घेऊन मँचेस्टरवाल्यांचा सूड घेतला पाहिजे.' याच वेळी सरकारने अमर्याद सारावाढहि केली होती आणि शिवाय शेतकी कमिशन नेमून शेतकऱ्याच्या दारिद्र्याचे खरे कारण म्हणजे सावकार हे आहे अशी चुकीची मीमांसा करून धूळफेक केली होती. त्यावरहि अनेक लेख लिहून, 'सरकारने उद्योगधंदे नाहींसे केले, पाटबंधारे बांधले नाहींत, जमिनीचा कस गेला त्याची व्यवस्था केली नाहीं इ. कारणामुळे दारिद्र्य येत आहे' याची जाणीव जनतेला करून दिली. आणि 'अमेरिकेसारखा प्रकार आपणांस करावयाचा नसला तरी जुलूम केला असतां चालणार नाहीं अशी सरकारची