पान:भारतीय लोकसत्ता.pdf/११०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०९
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता


असंतोषाची जागृति

 टिळकांनी शेतकऱ्यांची संघटना करण्याची जी चळवळ हातीं घेतली तिचें स्वरूप, तिचें उद्दिष्ट, तिची पद्धति व त्यांच्या मनांतील अंतःस्थ हेतु याची संपूर्ण कल्पना वरील अवतरणावरून येईल. गेल्या शतकाच्या शेवटच्या पंचवीस वर्षात हिंदुस्थानांत अठरा वेळां दुष्काळ पडला आणि त्यांत लक्षावधि शेतकरी कुटुंबे धुळीस मिळाली. या ज्वालामुखीचा बरोबर उपयोग करून त्यांत इंग्रजी राज्याची आहुती द्यावयाची हे टिळकांनीं निश्चित ठरविले होते, या निमित्ताने शेतकऱ्यांच्या चित्तांत धुमसणारा जो दुःखाग्नि त्याला योग्य चेतना देऊन त्याचें राजकीय असंतोषांत रूपांतर करण्याचे काम सुशिक्षित वर्गाकडून करावयाचे ही त्यांची पद्धति ठरली होती. पण तो काळ फारच कठिण असल्यामुळे बाह्यतः इंग्रज सरकारच्या राज्याच्या चिंतेमुळे आपण बोलत आहोत, असे आपल्या प्रतिपादनाला रूप द्यावयाचें असे त्यांचे धोरण होतें. तात्पर्यार्थ असा कीं, आपल्याला आलेल्या हीन दशेचें कारण इंग्रजी राज्य हे आहे, हे शेतकऱ्यांना दाखवून देऊन त्यांना त्या राज्याच्या प्रतिकारासाठीं सिद्ध करावें असा त्यांचा प्रयत्न होता. या पहिल्या कालखंडांतील अनेक लेखांतून याचें प्रत्यंतर आपणांस येईल. 'हिंदुस्थानांतील शेतकरी लोकांस बंड करावे लागेल काय ?' असे शीर्षक एका अग्रलेखाला त्यांनीं दिले आहे (६-१२-९२), अर्थात् 'नाहीं' हेंच उत्तर त्यांनी त्यावेळी दिले आहे, पण हें इंग्रजी राज्यास संकट आहे. आणि दारिद्र्य दूर झाले नाहीं तर इंग्रजी राज्यास धोका आहे असे त्यांनी सांगून ठेविलें आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे दारिद्र्य दूर करा, दारिद्र्य दूर करा असे ते सरकारला विनवीत आहेत व हें न झाल्यास साम्राज्याला धोका आहे असे इंग्रजी पंडितांच्या साह्याने बजावीत आहेत आणि दुसरीकडे सुशिक्षितांना, शेतकऱ्यांचे कल्याण करण्यांत तुमचेच कल्याण आहे, (तेव्हां ही आग तुम्ही पेटवाच) अशी प्रेरणा ते देत आहेत. 'सुशिक्षितांनीं काय केले पाहिजे ?' या निबंधांत हो चेतना जास्त स्पष्टपणे दिलेली आहे. "चिंचवड, नाशीक, चाफळ अशा ठिकाणीं जे धार्मिक उत्सव होतात तेथे खेड्यांतील लाखो लोक जमतात. तेथे तरुण सुशिक्षितांनी जावे आणि