पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
भारतीय लोकसत्ता

 टिळकांनीं हें जे लोकजागृतीचे कार्य केलें, त्याचे दोन भाग पडतात. १८९२ ते १९०३ हा एक व १९०३ च्या नंतरचा दुसरा. पहिल्या कालखंडांत 'कायदेशीर झगडा' हें त्यांचे धोरण होते. पण १९०४ सालापासून तें टाकून हळूहळू कायदेभंगाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार ते करूं लागले. बंगालच्या फाळणीमुळे निर्माण झालेल्या प्रक्षोभाचा फायदा घेऊन कायदेभंग, करबंदी, निःशस्त्र प्रतिकार, बहिष्कार किंवा ज्याला अलीकडे सत्याग्रह म्हणतात त्याच्या प्रचारास त्यांनी मोठया साहसाने प्रारंभ केला. १९०७ सालच्या 'नव्या पक्षाचे तत्वज्ञान' या व्याख्यानांत कायदेभंग व करबंदी यांची संपूर्ण कल्पना त्यांनी मांडलेली आहे. या कार्यक्रमाला हात घालून अखिल देशव्यापी आंदोलन प्रचलित करावयाचे हा त्यांचा १९०७ साली निश्चित निर्धार झालेला दिसतो. एवढ्यांत त्यांना अटक झाली आणि ही मोहीम तशीच राहिली. त्यांचे ते कार्य महात्माजींनी पुढे सिद्धीस नेलें. येथे आपणांस आतां टिळकांनी १८९० ते १९०३ या कालखंडांत येथल्या जनतेला अन्यायाचा प्रतिकार करण्याचे शिक्षण देऊन लोकायत्त शासनाच्या नागरिकत्वाचे गुण तिच्या अंगी निर्माण करण्यासाठीं जे प्रयत्न केले त्यांचा इतिहास पहावयाचा आहे.

दारिद्र्य व ज्ञान

 "दुष्काळांत आज लाखों लोक मुकाट्याने उपासमार होऊन मरतात. पण इंग्रजी राज्यपद्धतीचें जसजसें ज्ञान होत जाईल तसतशी दारिद्र्याची कारणें काढून टाकण्याची त्यांच्या मनांची जास्त प्रवृत्ति होईल व त्यामुळे अखेरीस सर्वत्र शेतकरी लोकांचे दंगे सुरू होतील. शेतकरी लोक जोपर्यंत अज्ञान आहेत अगर सज्ञान असून सुखी आहेत तोपर्यंत कांहींएक भीति नाहीं. पण दारिद्र्य व ज्ञान हीं एकत्र झाली म्हणजे त्यांची चकमक झडून लागलीच त्यांची ठिणगी पडते असे ब्लंटसाहेबांनी म्हटले आहे व ते त्यांचे म्हणणे अगदीं यथार्थ आहे. सरकारनें नाहींतर मध्यमस्थितींतील लोकांनीं शेतकऱ्यांची ही स्थिति सुधारण्याचे योग्य उपाय वेळींच अवश्य केले पाहिजेत." (केसरीतील लेख, खंड १ ला. पृ. १४२)