पान:भारतीय लोकसत्ता.pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०
भारतीय लोकसत्ता

नाहीं. या धर्मसंघांच्या सभा वरचेवर भरतात, ते आपलीं कार्य मतैक्याने व सहकार्याने करतात. संघांच्या नियमांचे सभासद अत्यंत दक्षतेनें पालन करतात, हे संघबंधु कधीं मोहवश होत नाहीत, अशा तऱ्हेचे वर्णन बुद्धाजवळ त्याच्या एका शिष्यांने केलेले आहे. आणि तें ऐकून, 'असे आहे, तोपर्यंत या संघांचा कधीहि विनाश होणार नाहीं, सारखा उत्कर्षच होत जाईल' असे बुद्धानें उद्गार काढले, असे बौद्धवाङ्मयांत नमूद केलेले आहे. या धर्मसंघाप्रमाणेच अंतर्गत स्वायत्तता असलेले व्यापाऱ्यांचे संघ असत. त्यांना श्रेणी, पूग, निगम, गण, संघ अशा संज्ञा दिलेल्या आढळतात. उत्तरकालीन वाङ्मयांत राजकीय गणराज्यांची स्मृति नष्ट झालेली दिसते. तरी या व्यापारी संघांचे उल्लेख मात्र संस्कृत वाङ्मयांत कायम सांपडतात. त्यांची स्मृति कधीं लुप्त झाली नाहीं, हे व्यापारी संघ चांगले बलिष्ठ व सुसंघटित होते. ते प्रतिष्ठित पेढ्यांचा देवघेवीचा व्यवहार करीत आणि आत्मरक्षणासाठी त्यांच्याजवळ चांगली सुसज्ज सेनाहि असे. अशा रीतीने धनशक्ति व लष्करीशक्ति या दोन्ही एकवटल्यामुळे हे व्यापारी संघ पुष्कळ वेळां सम्राटांनाहि जुमानीत नसत. व्यापारी संघाप्रमाणेच विद्येच्या क्षेत्रांतहि त्याकाळीं भरपूर स्वायत्तता असे. तक्षशिला, नालंदा ही विद्यापीठे संपूर्णपणे स्वयंशासित अशीं होतीं. यांना सरकारचा आश्रय असला तरी त्यासाठी सरकारचे निर्बंध त्यांना पाळावे लागत नसत. नालंदा विद्यापीठ हिंदु असलेल्या गुप्तसम्राटांच्या आश्रयाने चालत होते, तरी तेथे बौद्ध तत्त्वज्ञान व धर्म यांचेच शिक्षण प्रामुख्याने होत असे. यावरून असे दिसत की, विद्यादानाच्या कार्यांस राजे जरी मुक्तहस्तानें दान देत असत, तरी विद्यापीठांवर अमक्याच प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे, असे निर्बंध लादीत नसत. अंतर्गत स्वायत्तता ती हीच होय.

विनाशाची कारणें

 हिंदुस्थानांतील प्राचीन प्रजासत्ताक राज्यांची ही परंपरा हजार एक वर्षे अबाधित अशी चालून पुढे हळू हळू ऱ्हास पावू लागली आणि इ. सनाच्या पांचव्या शतकांत ती पूर्णपणें नामशेष झाली. नामशेष झाली हें म्हणणे सुद्धां बरोबर नाहीं. कारण पुढील वाङ्मयांत व लोकस्मृतींत तिचे नामहि शेष