पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

राहिलें नाहीं. इतका तिचा पूर्ण अस्त झाला. मौर्य, शुंग, या साम्राज्यांतच प्रजासत्ताकांना उतरती कळा लागली होती. गुप्त साम्राज्यांत तो विनिपात पुरा झाला आणि सर्वत्र राजसत्ता रूढ झाली. ती इतकी की, डॉ. जयस्वाल यांनी आपला ग्रंथ प्रसिद्ध करीपर्यंत (इ. स. १९२४) हिंदुस्थानांत प्राचीन काळी लोकशाही अस्तित्वांत होती, असे कोणाच्या स्वप्नांतहि आले नव्हते आणि आजहि प्रा. वेणीप्रसादासारख्यांना तें मान्य नाहीं. भारतांतल्या अशा आणखी किती उज्ज्वल परंपरा कालवश झाल्या आहेत, ते जाणण्यास तो कालच समर्थ आहे.
 प्राचीन प्रजासत्ताक राज्यांचा विनाश व लोप होण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रातिनिधिक सत्तेच्या तत्त्वाचा अभाव हें होय. या राज्यांत मताधिकार कुलानुसार प्राप्त होत असे. सर्व उच्च कुळे समान दर्जाचीं मानीत, आणि प्रत्येक कुलाचा प्रमुख हा सभेचा सभासद असे; त्यामुळे त्या काळीं विशाल- प्रदेशाचा अंतर्भाव एका प्रजासत्ताकांत होणे अशक्यच होते. चारपांच जिल्ह्याएवढें जरी राज्य झाले तरी सभासदांची संख्या हजारांनी मोजावी लागणार. आज ज्याप्रमाणें लाख संख्येला किंवा दहालाख संख्येला एक प्रतिनिधि अशी पद्धत आहे त्याप्रमाणे त्यावेळी हजाराला किंवा दहा हजारांना एक प्रतिनिधि अशी व्यवस्था असती तरी प्रजासत्ताकांची क्षेत्रमर्यादा वाढविणे शक्य झालें असतें. पण अथेन्स, स्पार्टी या ग्रीक प्रजातंत्राप्रमाणेच येथेहि प्रतिनिधिपद्धत उदयास आली नव्हती; त्यामुळे या राज्यांचा जीव नेहमीं लहानच राहिला आणि त्या प्रमाणांतच त्यांच्या सामर्थ्याच्या वाढीला मर्यादा पडल्या. राष्ट्रकूट, चालुक्य यांच्याएवढीसुद्धां विस्तीर्ण राज्ये वाढविणें प्रजातंत्रांना शक्य नव्हते, कारण मग सभासदांची संख्या लाखावर गेली असती व सावळा गोंधळ माजला असता. असे असल्यामुळे मौर्य, शुंग, गुप्त यांच्यासारखीं साम्राज्ये स्थापणे हे तर त्यांना स्वप्नांतहि शक्य नव्हते. अशा रीतीनें प्रजातंत्राच्या विकासाला अवसर नसल्यामुळे हीं राज्ये नेहमी लहानच राहिली; त्यामुळे त्यांच्या लष्करी सामर्थ्याच्या मर्यादाहि ठरून गेल्या आणि मग भरतखंडांत मोठमोठीं साम्राज्ये स्थापन होऊं लागतांच त्यांच्यापुढे त्यांचे बळ चालेनासे होऊन त्यांचा ऱ्हास होऊं लागला आणि गुप्तसाम्राज्यांत त्यांचा मागमूसहि राहिला नाहीं.