पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१०८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०७
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

त्सि टंगचें हेंच धोरण आहे. (अन् फिनिशड् रेव्होल्यूशन इन् चायना. पृ. २०३) मूळ जनता ही शक्ति जागृत केल्यानंतर या वर्गाशी वैर धरण्याचें कांहींच कारण नाहीं. निर्विष झालेले हे लोक काय करूं शकतील ?
 येथवर लो. टिळकांच्या तात्त्विक बुद्धिनिश्चयाविषयीं, त्यांच्या कृतबुद्धि- विषयीं विवेचन केले पण हा त्यांच्या जीवितकार्याचा केवळ पूर्व भाग होय. सर्व प्रत्यक्षांत आणणे हा पुढील भाग होय. कल्पना व कृति हे जसे काव्यरचनेचे किंवा इतर कोणच्याहि कलाकृतींचे दोन भाग होत, त्याचप्रमाणे तत्वज्ञान व कृति हे कोणच्याहि समाजविषयक कार्याचे दोन भाग होत. त्यांतील पहिल्याला दुसऱ्याची, तत्त्वज्ञानाला कृतीची जोड मिळाली नाहीं तर तत्त्वज्ञान पुष्कळ वेळां व्यर्थ ठरते आणि तसे झाले असते तर टिळक हे टिळक झाले नसते. पण त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला तर स्पष्ट असें दिसून येते की पहिल्या आठदहा वर्षांच्या कालांत त्यांचे तत्त्वचिंतन चालूं होतें आणि पुढील तीस वर्षे त्या अन्वयें कृती करण्यासाठीं, तो बुद्धिनिश्चय प्रत्यक्षांत आणण्यासाठीं ते अविश्रांत श्रम करीत होते. लोकसत्तेवांचून स्वातंत्र्य व्यर्थ होय, लोकशक्ति हीच खरी शक्ति होय व श्रम करणारी जनता, शेतकरी, मजूर म्हणजेच लोक होत हें लोकशाहीचे मूलभूत सिद्धान्त प्रारंभीच्या कालांत त्यांच्या मनांत निश्चित झाले. आतां हें जें त्यांना वाटले तें शेतकऱ्याला वाटावयास लावणे, आपण म्हणजेच खरा समाज असून आपल्या ठायीं एक महाशक्ति वास करीत आहे हा अहंकार शेतकऱ्याच्या ठायीं निर्माण करून त्याला कार्यप्रवृत्त करणे, हे पुढील कार्य होते. हजारों वर्षे या देशांतील श्रमिक जनता अज्ञान, दारिद्र्य व दास्य यांत पिचत पडली होती. अन्याय, जुलूम, छळ सहन करणे, हें तिच्या अंगवळणींच पडून गेलें होतें. अन्यायाचा प्रतिकार हा तिच्या स्वप्नांतहि नव्हता. अर्थात् अशी जनता लोकशाही कधींच स्थापूं शकत नाहीं. लोकायत्त देशाच्या नागरिकांचें 'अन्यायाचा प्रतिकार' हे पहिले लक्षण असते. त्या वृत्तीच्या अभावीं माणूस या संज्ञेला सुद्धां तो पात्र नसतो. तेव्हां या भूमींतील शेतकऱ्याला त्याच्या स्वत्वाची जाणीव देऊन प्रतिकाराला प्रवृत्त करून येथल्या भावी लोकशाहीच्या मंदिराचा पाया रचावयाचा हे धोरण निश्चित करून १८९० सालापासून टिळक त्या कार्याला लागले.