पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०४
भारतीय लोकसत्ता


लोक शब्दाची व्याप्ति

 वरील उताऱ्यांतून लोकांची सत्ता, प्रजेचे हक्क, लोकांचें सुख असा उल्लेख वारंवार आढळतो. त्यांतील 'लोक' या शब्दाची टिळकांच्या मनांत काय व्याप्ति होती असा एक प्रश्न उपस्थित होतो. कारण हा शब्द वापरणारे लोक पुष्कळ वेळां जनतेची दिशाभूल करीत असतात. 'सर्व लोक' या अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्यांतील शब्दांत निग्रोंचा समावेश मुळींच होत नव्हता. पेरिक्लीज जेव्हां ग्रीक लोकशाहीचा अभिमानाने उल्लेख करी तेव्हां त्याच्या 'लोक' या शब्दांत अथेन्सच्या एकदशांश नागरिकांचाच समावेश होत असे. सोव्हिएट रशियांत सर्वाना मुद्रणस्वातंत्र्य मिळेल असें म्हणून प्रवदा पत्राने पुढल्याच वाक्यांत कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधकांना कागदाचा एक कपटाहि मिळणार नाहीं असें सांगून टाकल्याचे आपण पाहिले आहे. टिळकांच्या मनांतहि अशीच फसवणूक असेल असे गृहीत धरून टीकाकारांनी 'लोक' या शब्दाची टिळकांची विवक्षा अगदीं मर्यादित होती असा अभिप्राय दिला आहे. इंग्रजांनी तसा प्रचार चालविला होता; सायमन कमिशनने तर महात्माजींच्या चळवळीवरहि तसाच शेरा मारला होता. पण यांत कांहीं नवल नाहीं. नवल आहे तें हें कीं, पामीदत्त नांवाच्या एका हिंदी गृहस्थानेहि आपल्या 'इंडिया टुडे' या नांवाच्या पुस्तकांत अशीच टीका केली आहे. 'टिळकांच्या नेतृत्वाने चाललेल्या राष्ट्रीयपक्षाचे आवाहन कनिष्ठ मध्यम वर्गापर्यंतच गेले होते. शेतकरी, कामकरी वर्गापर्यंत त्याची गति नव्हती. या पक्षाच्या नेत्यांना अर्वाचीन दृष्टि नव्हती. ती असती तर त्यांनी या कनिष्ठ वर्गाची संघटना केली असती. खरे म्हणजे या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांजवळ शास्त्रशुद्ध असें कोणतेच राजकीय तत्त्वज्ञान नव्हते. जुनाट धर्माच्या व लोकभ्रमाच्या पायावर राष्ट्रीय चळवळ उभारण्याचा त्यांचा प्रयत्न होता.' असा पामदत्तांनीं अभिप्राय दिला आहे. याहिपेक्षां विस्मयजनक गोष्ट अशी की कित्येक कॉंग्रेसभक्तांतहि हा समज रूढ आहे. १९२० सालानंतरच्या नव्हे तर त्या आधींच्या केसरीवरहि तो जमीनदार, सावकार, संस्थानिक, वरिष्ठवर्ग यांचा पक्षपाती होता, वरिष्ठ वर्गाचे वर्चस्व