पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०५
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

त्याला टिकवावयाचे होते, असे आरोप कोणी कोणी केले आहेत. काँग्रेस हीच खरी टिळकांची वारसदार आहे, असे अभिमानाने सांगणाऱ्या लोकांतहि हा समज असावा हें टिळकांचे नव्हे तर जनतेचें दुर्दैव होय.
 तें कसेंहि असो. हा समज अत्यंत भ्रामक आहे. लोक किंवा जनता या शब्दाचा जेवढा व्याप आज आपल्या मनांत आहे, तेवढा सर्व व्याप टिळकांच्या मनांत अगदी आरंभापासून शेवटपर्यंत, म्हणजे १८८० सालापासून १९२० पर्यंत, सतत अविचलित अशा स्थितीत होता. या पदाच्या व्याप्तीविषयीं त्यांच्या मनांत कधीं अणुमात्रहि संदेह आलेला दिसत नाहीं. केसरीचे पहिल्या पंचवीस वर्षांचे अंक पाहिले तर मजूर, काबाडकष्ट करणारे लोक, शेतकरी, कारागीर, कोष्टी, साळी, माळी, भिल्ल, कातवडी यांची चिंता, त्यांच्या हिताची जपणूक, त्यांच्या उन्नतीची काळजी ही पानापानावर लिहिलेली आपणांस दिसेल. (केसरीचे पुढील अंक पहा. २-२-९२, ६-१२-९२, २४-१-९३, ४-७-९३, १०-४-९४, १८-९-९४, ८-८-९९, मार्च ते जुलै १९०० बहुतेक अंक, जून ते सप्टेंबर १९०१ बहुतेक अंक, ११-११-१९०२, ६-८-१९०७) हे लोक म्हणजेच जनता, हे लोक म्हणजेच देश हा विचार प्रथम केसरीनेंच अट्टाहासाने सांगितला आहे. 'समाइकीनें उभारलेल्या भांडवलाचे कारखाने' या केसरीच्या पहिल्या वर्षी लिहिलेल्या लेखांत संपादक म्हणतात 'देश सधन असो की निर्धन असो, जित असो वा अजित असो, लोकसंख्येच्या मानाने हलक्या दर्जाचे म्हणजे काबाडकष्ट करून निर्वाह करणारे लोकांची संख्या जास्त असावयाची. याकरितां या समाजाची स्थिति जोपर्यंत सुधारली नाहीं, तोपर्यंत देशस्थिति सुधारली असे कधींहि म्हणतां येणार नाहीं.' या वचनावरून प्रारंभापासूनच केसरीकारांची दृष्टि कोणीकडे होती ते दिसून येईल. आणि पुढील लेख वाचल्यावर या खऱ्या जनतेचा टिळकांना कधींच विसर पडला नव्हता, किंबहुना तेच त्यांचें अचल असे लक्ष्य होते याविषयीं शंका उरणार नाहीं. 'मध्यमवर्गीय सुशिक्षितांनी या लोकांच्या झोंपडींत जाऊन त्यांच्यात मिसळून त्यांची स्थिति सुधारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत' असा तरुणांना ते सारखा उपदेश करीत असत. 'समाजाहून सुशिक्षितांचा वर्ग निराळा समजण्याइतके मौर्ख्य