पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०२
भारतीय लोकसत्ता

टिळकांनी केसरीच्या गर्जना करून या देशांतील महाशक्तीला जे आवाहन केले त्याला आहे हे कोणाच्याहि सहज ध्यानांत येईल. हिंदुस्थानचे भाग्य असे की टिळकांच्या मागून या दिव्यशक्तीची उपासना पुढे चालविण्यास महात्माजींसारखा अलौकिक उपासक येथे जन्मास आला आणि आज पंडित जवाहरलाल नेहरूहि त्याच सामर्थ्याच्या साह्याने पुढे पाऊल टाकीत आहेत. सन्यत्सेननंतर चीनमध्ये जसा चिआंग कैशेक प्रबळ झाला तसा कोणी दंडसत्ताधर येथें टिळकांच्या मागून आला असता तर त्याने कांहीं काल तरी त्यांचे कार्य शून्यवत् करून टाकले असते. पण तो सर्व पुढचा इतिहास आहे. सध्या आपणांस टिळकांचे कार्य पहावयाचे आहे.
 लोकमान्यांचा हिंदुस्थानांत कमी गौरव झाला असे नाहीं. पण आतांपर्यंत 'हिंदी असंतोषाचे जनक' 'भारतीय स्वातंत्र्याचे उद्गाते' याच पदव्यांनी आपण त्यांना गौरविले आहे; पण याचबरोबर लोकशाहीची त्यांनी जी सेवा केली तिच्याकडे द्यावे तितकें लक्ष आपण दिलेले नाहीं. इतके दिवस ही उपेक्षा कांहीं अंशीं क्षम्य असली तरी आतां आपली लोकशाही कशी यशस्वी करावी याचे आपण चिंतन करीत असतांना या भूमींतल्या लोकसत्तेच्या त्या आद्यप्रणेत्याच्या प्रयत्नांचा आपण अभ्यास न करणे आत्मघातकीपणाचे होईल. या दृष्टीने आपण विचार केला तर आपणांस असें दिसून येईल की, टिळकांनी आपले शक्तिसर्वस्व ही भरतभूमि लोकसत्ताक व्हावी यासाठी खर्च केले आहे. त्यांच्या जीविताचें अंतिम ध्येय केवळ स्वातंत्र्य हें नसून लोकसत्ताक स्वातंत्र्य हे होते, या धोरणाला अनुसरूनच त्यांनी स्वातंत्र्याचे मार्ग आखले होते आणि संघटना उभारल्या होत्या. त्यांचे ध्येय, त्यांचे मार्ग, त्यांच्या निष्ठा व त्यांचे प्रयत्न यांचा आपण अभ्यास केला, तर पौर्वात्य जगांत लोकमान्यांच्या एवढा लोकायत्त शासनाचा निःसीम व समर्थ पुरस्कर्ता कोणीहि झाला नाहीं, हे आपल्या सहज ध्यानीं येईल व आपल्या सध्यांच्या खडतर मार्गक्रमणाच्या काळी त्यांनी पाजळून ठेवलेल्या नंदादीपाचा प्रकाश क्षणभरहि मंदावू द्यावयाचा नाहीं असा आपण निश्चय करूं. यासाठीच तो अभ्यास आतां करावयाचा आहे.