पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०१
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

मूक, अंध, अज्ञ अशी अनुचर म्हणून होती. तशी ती जगाच्या प्रारंभापासून प्रत्येक संग्रामांत आहेच. बळी जाणे एवढेच तिचे दरवेळीं कार्य असे. तसे तें या वेळींहि होते. तो संग्राम जनतेचा नव्हता. जनता हें सामर्थ्य त्यावेळीं प्रगटच झाले नव्हते. या संग्रामाची सर्व कल्पना, त्याची योजना, त्याचे नेतृत्व व त्याचें सूत्रचालकत्व, सर्वच्या सर्व नानासाहेब, कुमारसिंह, अयोध्येचे नबाब यांच्या हात होते. त्याचा आरंभ, मध्य व पर्यवसान त्यांच्याच हातून व्हावयाचे होते व तसें झालेहि. सर्वसाधारण अज्ञ जनतेला या संग्रामांत कसलेच आकर्षण नव्हते. हा संग्राम तिच्यासाठीं आहे किंवा तिच्या सामर्थ्यानें तो चालावयाचा आहे, अशी कोणाचीच कल्पना नव्हती. 'आपण म्हणजे एक महाशक्ति आहों' अशी अस्फुटसुद्धां जाणीव जनतेला नव्हती. स्वातंत्र्यानंतर पुन्हां पूर्वीप्रमाणेच अंदाधुंदी चालू होईल, असा धसकाच जनतेला होता. तो संग्राम फसला त्याचें कारण हेच होय असें स्वतः सावरकरांनीच म्हटले आहे. (सत्तावन्नचें स्वातंत्र्य समर पृ. ५६४) असो. तात्पर्यार्थ असा की टिळकांच्या पूर्वी या देशांत इतर देशापेक्षांहि निकृष्ट स्थिति होती. तेथे लोकसत्तेचे नाहीं पण निदान राष्ट्रीय संघटनेचे तरी प्रयत्न होते. येथल्या स्वातंत्र्ययुद्धांत तेहि नव्हते. अशा सर्व अंधेऱ्या अवस्थेत जग असतांना हिंदुस्थानसारख्या एका मागासलेल्या देशांत टिळकांनीं 'जनता' याच नेमक्या शक्तिदेवतेस आवाहन करावे यांतच त्यांचें लोकोतरत्त्व, त्यांची कालज्ञता व त्यांची सर्वगामी दिव्यदृष्टि यांचे प्रत्यंतर येते. सध्यां क्रान्तीच्या उत्तर काळांत, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या देशांत लोकसत्ता यशस्वी होण्याचा संभव निर्माण झाला आहे. इतर देशांत जुनी सरंजामशाही नष्ट करण्याचे भगीरथ प्रयत्न लोकांना करावे लागले तरी अजूनहि कित्येक ठिकाणीं ती जीव धरून आहे. या देशांत एका वर्षाच्या आंत ती नामशेष झाली. जनता जागृत झालेली नसती तर हें कालत्रयीं शक्य झालें नसतें. भोपाळकर, कोल्हापूरकर, इंदूरकर- सर्वसर्व नमले ते मेनन यांना किंवा वल्लभभाईंना नमले नाहीत, त्यांच्या मागच्या विराट जनतेपुढे ते नमले. भांडवलशाही अजून येथे मग्रूरपणे वागत आहे. तिची पकड अजून ढिली होत नाहीं. तरी तिलाहि लवकरच नेस्तनाबूत करतां येईल, असा आत्मविश्वास येथील नेत्यांना व जनतेला वाटत आहे. या सर्वांचें श्रेय १८८१/८२ सालीं