पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
[प्रकरण
भारतीय रसायनशास्त्र



श्वरांनी असे उल्लेख कोठे केले आहेत हे तयारच असल्यामुळे येथे देणे सोपे आहे. ह. प. श्रीपतिबोवा भिंगारकर यांनी आपल्या श्रीज्ञानेश्वरवादाच्या पुस्तकांत याविषयी माहिती दिली आहे. (पृ. ७०।७१ पहा). ज्ञानेश्वरीत किमयाविषयक ओंव्या होत्या, व त्या पुढे गाळण्यांत आल्या. या वादाचा समारोप करितेवेळी त्यांनी या प्रकारे लिहिले आहेः- "ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीत किमयेच्या ओंव्या घातल्या होत्या. त्याचे कारण ते ( ह्म. सांप्रदायिक लोक) असे सांगतात की, नित्यनेमानें श्रद्धापूर्वक ज्ञानेश्वरीचे पारायण करणाऱ्यास उदरनिर्वाहाची काळजी लागू नये, ह्मणून मुद्दाम त्या ओंव्या घातल्या होत्या. ग्रंथ तयार झाल्यावर ज्ञानेश्वरानें तो ग्रंथ आपले ज्येष्ठ बंधु असून गुरुस्थानापन्न असलेले जे निवृत्तिनाथ त्यांस दाखविला. त्यांनी समग्र वाचून पहातां असे सांगितले की, दुसऱ्याच्या ग्रंथावर टीका करण्यांत विशेष ते काय ? नंतर निवृत्तिनाथांनी त्या ग्रंथांतील किमयेसंबंधाने ज्या ओंव्या होत्या त्यापैकीं कांहीं ओंव्या मुळीच गाळून टाकून कांहीं ओंव्याची फिरवाफिरव केली त्यांचा हेतु इतकाच की, जीवमात्र प्रपंचांत निमग्न झालेला बहिर्मुखवृत्तीचा आहे, आणि हा ग्रंथ अध्यात्मविद्येने ओतप्रोत भरलेला आहे; जर या ग्रंथांत किमया आहे असे समजले तर सर्व लोक अध्यात्मविद्येचा त्याग करून किमयेच्या ओंव्यांचा स्वीकार करतील; कारण प्रपंचांत द्रव्याची अवश्यकता सर्वांसच असते, व परमार्थात द्रव्य आणि स्त्री अत्यंत मादक आहेत व त्या मोहाने मनुष्यास परमार्थ करण्याची इच्छाहि होत नाहीं. असो. ज्ञानेश्वरीतील किमयेच्या ओंव्या निवृत्तिनाथाने गाळून टाकल्या, किंवा एकनाथाने टाकिल्या. कसेही असले तरी या कथेचा सारांश इतकाच की, ज्ञानेश्वरींत किमयेच्या ओव्या होत्या, पण त्या पुढे गाळून टाकण्यात आल्या. सध्यां प्रचलित असलेल्या ज्ञानेश्वरीचे सूक्ष्म अवलोकन केल्यास किमयेच्या ओव्यांत जो फेरबदल झाला आहे तो मात्र कांहीं ओव्यांत आढळण्यांत येतो; तथापि, गाळून टाकलेल्या ओव्या कोणत्या हे मात्र निश्चयाने सांगता येत नाहीं. वनस्पतींच्या योगाने तांब्याचे सुवर्ण, व कथिलाचे रुपे होते याविषयी पद्मपुराण (?), रसयोगप्रकाश, रसेंद्रचितामणि, गोरक्षकिमयागार, रसा