पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[प्रकरण
भारतीय रसायनशास्त्र



शकापूर्वी ३।४ हजार वर्षांपासून तरी झाला असला पाहिजे, असें ग्रंथविस्तारावरून कळून येईल. तांत्रिकमार्गांतील अनेक लोकांच्या अनेक शोधांमुळे भारतीय रसविद्या परिपूर्ण होऊन, तींत देहसिद्धि व लोहसिद्धि परिपूर्णपणे साधली होती; कालेंकरून ही विद्या लोपत लोपत आज बहुतेक तिचा नाशच झाला आहे. ग्रंथ राहिलेले असल्यास ते आमचे नशीब; पण या विद्या परंपरेने जाणणारे आतां फार थोडे आहेत. अद्यापिहि भरतखंडांत, नाहीं ह्मणतां, देहसिद्धि व लोहसिद्ध जाणत असलेले महात्मे आहेत, हे भरत वर्षाचे सुदैव होय ! असो
 रसशास्त्रांच्या उगमाविषयीं स्वतः तांत्रिक लोकांचे काय मत आहे हें पाहून हे प्रकरण संपवितों :-

भूतानुकंपप्रवणो महेशः । स्मशानवासी जगदादिनाथः ॥
*स्ववीर्ययुक्तागदयोगरत्नैः | कीर्णानि तंत्राणि बहूनि चक्रे ॥१॥
रसग्रंथेषु तंत्रेषु धातुशोधनमारणे ॥
विवृत्ते च विशेषेण रसराजस्य संस्कृतिः ॥ २ ॥

 यावरून रसतंत्रांतून धातूंची शोधन व मारणक्रिया व विशेषेंकरून पाऱ्याचे (आठरा) संस्कार- यांचे विवरण असते किंवा होते हें कळून येईल. रसविद्येची व रसशास्त्रांची प्रशंसा त्यांनी या प्रकारे केलेली आहे. :-

रसविद्या परा विद्या त्रैलोक्येऽपिच दुर्लभा ॥
भुक्तिमुक्तिकरी यस्मात्तस्मात् ज्ञेया गुणान्वितैः ॥ १ ॥
साध्येषु भेषजं सर्वं ईरितं तत्ववेदिना ॥
असाध्येष्वपि दातव्यो रसोऽतः श्रेष्ठ उच्यते ॥ २ ॥
रसे रसायने ज्ञाने बुद्धिर्यस्य न हीयते ॥
तमहं पुरुषं वंदे; अन्ये ते शुक्रवाटकाः ॥ ३ ॥

 या प्रकारें, रसविद्येने लोहसिद्धि, द्रव्यसिद्धि, किमया ऊर्फ हेमतारादिकरण साधते, व रसायनाने असाध्य रोगही जाऊन देहाचे आयुरारोग्य सिद्ध होते; व यांमुळे पुढे मुक्तीही मिळते अशीं तांत्रिकांची मते आहेत. निरोगी-देहनिश्चिंत-मन ही असल्यानंतर, इच्छा असेल त्याला मोक्षसाधनास वाटेल तितकी सवड असते हे उघड आहे.


 * ह्मणजे पाऱ्याने युक्त अशा उत्तम औषधांच्यायोगे.