पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/514

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५१) विद्येस उत्तेजन आहे; तथापि ज्योतिषगणिताच्या व त्या शास्त्रांतील दुसऱ्या गहन व मनोरंजक भागांच्या शोधपूर्वक अभ्यासास कांहींच साधन नाही म्हटले तरी चालेल. छापखान्यांमुळे उलटा एक वाईट परिणाम होत चालला आहे की, पंचांग करणारे जोशी पूर्वी गांवोगांव होते, त्यांची आतां आवश्यकता राहिली नसल्यामुळे त्यांचा लोप होत चालला आहे. अशा स्थितीत भास्करसिद्धांतासारख्या उपपत्तिग्रंथाचें अध्ययन कोण करितो ? मुहूर्ताची आवश्यकता आणि जातकग्रंथोक भविष्यज्ञानाविषयी लोकांची उत्कट इच्छा अद्यापि पूर्वीप्रमाणे कायम आहेत व पुढेही असणार, त्यांच्यामुळे ग्रहगणित थोडे तरी करणे जोशांस अवश्य पडतें, यामुळे गणितस्कंध अस्तित्वात आहे; आणि जातकस्कंध पूर्वीप्रमाणे नाहीं तरी बऱ्याच चांगल्या स्थितीत आहे. तथापि यांत भूषण मानण्यासारखें कांहीं नाही. - कोपर्निकसाचा ग्रंथ शक १४६५ मध्ये झाला. त्यापूर्वी आमच्या देशांतील व 'युरोपांतील ज्योतिष सारख्याच स्थितींत होतें झटले तरी चालेल. मात्र त्या दोहोंमध्ये मोठा भेद हा होता की, आमचे युरोपच्याप्रमाणे वर्धमानस्थितीत नव्हतें. कोपर्निकसाच्यापूर्वी नुकतेच आमच्या देशांतले शोधक ज्योतिषी गणेश दैवज्ञ आणि त्याचा पिता केशव दैवज्ञ हे झाले. कोपर्निकसापासून युरोपांतल्या ज्योतिषशास्त्राचे इतकें स्थित्यंतर झाले की, पूर्वीचे आणि नंतरचे ह्यांस अनुक्रमें वटवृक्षाचा नुकताच उगवलेला रोपा आणि अनेक शतकें वाढून आपल्या छायेंत हजारों जीवांस आश्रय देणारा अति भव्य वटवृक्ष यांची उपमा शोभेल. आमचे आहे ते आहे.* युरोपखंडांत ज्योतिःशास्त्र सांप्रत उत्तमावस्थेस आले आहे, याचे एक महत्वाचे कारण नौकागमन हे होय. आमच्या देशांत ते कारण नाहीं, तथापि ज्योतिषाच्या अध्ययनाची दुसरी कारणे आहेत. पंचांग करणे हे पहिले कारण. यांत धर्मशास्त्र आणि मुहूर्त यांचाही अंतर्भाव झाला. जातक हे दुसरे कारण आणि जिज्ञासा हे तिसरें कारण. कोणाचें असें मत दिसते की आमच्या जुन्या ज्योतिःशास्त्रांत कांहीं अर्थ राहिला नाही. आमचे पंचांग बुडालें तरी हरकत नाही असे त्यांस वाटते, परंतु थोडासा शोध केला असता त्यांस दिसून येईल की, आमच्या प्राचीन पूर्वजांनी ज्योतिःशास्त्रांत जे प्रयत्न केले आहेत त्यांहून जास्त कोणत्याही प्राचीन राष्ट्रांनी केले नाहीत. आणि त्या कामांत त्यांस वैद्यकादि इतर अनुभवावलंबी शाखांपेक्षां पुष्कळ अधिक यश आलेलें आहे. तसेच खेड्यापाड्यांतील स्थिति किंचित तरी ते पहातील तर त्यांस दिसून येईल की, पंचांगाची आवश्यकता ज्यांस आहे असे शेकडा ९० किंबहुना ९५ लोक आहेत. नवीन सुशिक्षितांनीं पंचांगाकडे दुर्लक्ष केलें ह्मणून सामान्य लोक ते टाकतात असें नाही. पंचांगासारख्या ज्योतिर्दर्पणाच्या आवश्यकतेमुळेच ज्योतिःशास्त्र आमच्यांत उत्पन्न झाले. पंचांगाची शुद्धि करणे योग्य आहे व ज्योतिषाविषयी असलेली जी पूज्यबुद्धि ति ला इष्ट असेल ते शुद्ध वळण देण्याची इच्छा धरणे योग्य होईल; परंतु सुशिक्षितांनी त्या पंचांगाचा व त्या पूज्यबुद्धीचा अव्हेर करणे योग्य नाही. " ज्योतिर्विलास, (दुसरी आवृत्ति ) . ५१,५२ पहा.