पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९३) आहे असें ह्मणण्यास हरकत नाही. त्यास ही अवस्था येण्यास दुबिणीची कल्पना आणि नौकागमनाची आवश्यकता या दोन गोष्टी विशेष कारणीभूत झाल्या हे खरें, तथापि त्या अवस्थेस कारणीभूत असे उद्योगी आणि बुद्धिमान पुरुष ति कडे पुष्कळ झाले तसे इकडे कोणी झाले नाहीत. त्या मालिकेंत घालण्यास या देशांत जयसिंह हा एक मात्र मला दिसतो. जयसिंह हा रजपुतस्थानांतला एक राजा होता. तो विक्रम संवत् १७५० (शके १६१५, इ. स. १६९३) मध्ये अंभेर एथे गादीवर बसला. पुढे त्याने सांप्रतचें जयपूर शहर वसवून ती राजधानी केली. याच्या सिद्धांत सम्राट् ग्रंथांत याला मत्स्पदेशाधिपति मटले आहे. भारतीय, मुसलमानी, आणि युरोपियन ज्योतिष ग्रंथांप्रमाणे दृक्प्रत्यय येत नाही ह्मणून वेधशाला स्थापून वेधयंत्रे नवी करून त्यांनी वेध घेऊन नवीन ग्रंथ करण्याचे त्याने मनांत आणिलें, व त्याप्रमाणे सिद्वीस नेले. त्याणे जयपूर, इंद्रप्रस्थ * (दिल्ली), उज्जयिनी, काशी, मथुरा येथें वेधशाला स्थापिल्या. धातूची यंत्रे लहान असतात, ती झिजतात, वगैरे कारणांनी त्याने वेधोपयोगी अशी पाषाणाची आणि चुन्याची दृढ यंत्रे फार मोठमोठी केली. त्यांत जयप्रकाश, यंत्रसम्राट् , भित्तियंत्र, वृत्त षष्ठांश, इत्यादि कांहीं यंत्रे नवीं कल्पिली. आणि वेध घेण्यास चांगले ज्योतिषी लावून सात आठ वर्षे वेध घेऊन "झिजमहंमद " या नांवाचा एक ग्रंथ आरबी भाषेत आणि “सिद्धांतसम्राट नांवाचा संस्छत भाषेत केला. त्यावेळी दिल्लीचा बादशाहा महमदशाह हा होता. त्याचे नांव पहिल्या ग्रंथास दिले आहे. त्यास 'मिजस्ति ' असेंही नांव होते असे दिसते. हा ग्रंथ हिजरी सन ११४१ (शके १६५०) चा आहे. सिद्धांतसम्राट् हा ग्रंथ जगन्नाथ नामक पंडिताकडून शके १६५३ (इ. स. १७३१) च्या सुमारास करावलेला आहे. मुख्यतः तो मिजस्ति ग्रंथाचाच अनुवाद आहे. त्यांत १३ अध्याय आहेत. त्यांची १४१ प्रकरणे आहेत व त्यांत १९६ क्षेत्रांचा विचार आहे. त्यांत शके १६५०, ५१, ५२ या वर्षी केलेले वेध लिहिलेले आहेत आणि उलगवेग इत्यादिकांचे काही प्राचीन वेध घेऊन त्यांच्या व स्वतःच्या वेधाच्या तुलनेने ग्रहगत्यादिक माने काढलेली आहेत. सिद्धांतसम्राट् ग्रंथ या प्रांतांत संपूर्ण कोठे आढळला नाही. कोल्हापूर येथील राजज्योतिष्यांच्या अपूर्ण पुस्तकावरून केलेली एक प्रत आनंदाश्रमांत आहे. तींत प्रथम २ अध्याय आहेत. त्यांत खगोल आणि भूगोल ह्यांविषयी उपोद्घातरूपाने सामान्य विवेचन आहे. पहिल्या अध्यायांत १४ प्रकरणे, १६ क्षेत्रे आणि दुसन्यांत १३ प्रकरणे २५ क्षेत्रे आहेत. आणखी त्या पुस्तकांत यंत्र, ज्याचापादिरेखागाणितसाध्य, विप्रश्न, मध्यम, स्पष्ट हे अध्याय आहेत. स्पष्टाध्याय अपूर्ण आहे. इतक्यांत ६७ क्षेत्रे आहेत. ह्या सगळ्यांची ग्रंथसंख्या सुमारे ५५०० आहे. यावरून एकंदर ग्रंथ सुमारे १० हजार असेल. तो ५० हजार आहे अशी दंतकथा असल्याचे सुधाकर लिहितात. परंतु हे असंभवनीय आहे. त्यांनी तरी सर्व ग्रंथ पाहिला आहे असें नाहीं.

  • इंद्रप्रस्थाचे अक्षांश २८.३९ दिले आहेत. ते दिल्लीच्या हल्लींच्या अक्षांशांशी इतकेच आहेत.