पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रंथ. यावरून ग्रंथकाराचें नांव नागेश, त्याच्या पित्याचें नांव शिव आणि पितामहाचें नांव तुकेश्वर होते. तुकेश्वर आणि शिव यांचे वर्णन केलेले कितपत खरे असेल ते असो; परंतु ग्रंथकाराने दृग्गणितानुसार ग्रंथ केला असें वर्णन केल्याप्रमाणे त्याच्या ग्रंथांत कांहीं अर्थ दिसत नाही. याणें आपलें स्थान दिलं नाहीं; परंतु चरखंडे ४।। पलभेची दिली आहेत. ग्रंथांत क्षेपक किंवा चक्रध्रुवक नाहीत. ग्रंथासमवेत निराळ्या सारण्यांत तें असावे असे दिसते. मी पाहिलेल्या (डे. का. नंबर ४२२ सन १८८१।८२ व आनंदाश्रम नं० २६१९.) ग्रंथासमवेत सारण्या नाहीत. नागनाथ शिष्य यादव याणे या ग्रंथावर शक १५८५ चे उदाहरण केले आहे. मुनीश्वर. गूढार्थप्रकाशिकाकार रंगनाथ याचा हा पुत्र होय. त्या टीकेचा जो काल (शक १५२५) तो याचा जन्मकाल होय. भास्कराचार्याच्या लीलावतीवर निसृष्टार्थदूती लीलावतीविवृति नांवाची टीका, शिरोमणीच्या गणित आणि गोल या अध्यायांवर मरीचि नांवाची टीका, आणि सिद्धांतसार्वभौम या नांवाचा स्वतंत्र सिद्धांत ग्रंथ, असे याचे तीन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. शिवाय पाटीसार नांवाचा याचा ग्रंथ आहे असें गणकतरंगिणींत लिहिले आहे. तो पाटीगणितावर स्वतंत्र ग्रंथ असावा असे दिसतें. मरीचि टीकेच्या अंती पूर्वार्धसमाप्तीचा काल याने चमत्कारिक रीतीने सांगितला आहे. तो असाः शको भूश्युतो नंदभू २९ हत्फलस्य निरेकस्य मूलं निरेकं भवे । तदर्धं भवेन्मास इंदू १ नितोऽयं तिथि २ निता पक्षवारौ भवेतां ॥ १२ ॥ नक्षत्रवारतिथिपक्षयुतिश्च योगो विश्वै १३ र्युताखिलयुतिः पदमभ्रवेदाः ४० । अस्या यदात्र परिपूर्तिमितो मरीचिः श्रीवासुदेवगण काग्रजनिर्मितोयं ।। १३ ।। यावरून असें निघतें की शक १५५७ आषाढ (४) शुक्ल (१) पक्षांतील तृतीया (३) रविवार (१) पुष्य नक्षत्र (८) व्याघात योग (१३) या दिवशी टीका समाप्त झाली. मरीचीचे उतरार्ध शक १५६० मध्ये समाप्त झाले. सिद्धांतसार्वभौम १५६८ मध्ये समाप्त झाला, आणि त्यावर मुनीश्वराचीच टीका आहे, ती शक १५७२ मध्ये समाप्त झाली असें सुधाकर लिहितात. मरीचिटीका फारच विस्तृत आहे. तिची ग्रंथसंख्या २५००० आहे. तींत प्राचीन वचनांचा संग्रह फार आहे. लीलावतीटीका सुमारे ७००० आहे. ती विद्वन्मान्य आहे. सार्वभौमपूर्वार्धटीका ८००० आहे. मुनीश्वर हा भास्कराचार्याचा मोठा अभिमानी होता असें त्याच्या ग्रंथांत जागजागी दिसते. सार्वभौमसिद्धांतांत वर्षमान, ग्रहभगण, इत्यादि मानें मूर्यसिद्धांतांतलींच घेतली आहेत. विश्वरूप असें मुनीश्वराचे दुसरे नांव होते. कार्तिकस्वामीच्या रुपेन आपल्यास ज्ञानप्राप्ति झाली असे त्याने मरीचि टीकेंत लिहिले आहे. कृष्णाचा शिष्य नारायण हा माझा गुरु असें हा लिहितो. हे दोघे याच वंशांतले असावे. शहाजहान बादशहाचा मुनीश्वरास आश्रय असावा असें त्याच्या ग्रंथांवरून दिसते. शहाजहान बादशहास राज्याभिषेक झाल्याचा हिजरी सन, वेळा आणि त्या वेळची लग्नकुंडली त्याने सार्वभौम सिद्धांतांत दिली आहे. त्यावरून निघतें की हिजरी सन