पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
भारतीय चलनपद्धति.

उलट हुंडया विकतां याव्यात व स्टेट सेक्रेटरीने ह्या हुंडया घेऊन येणारांस ह्या निधीतून सोनें द्यावें म्हणून ही गंगाजळी निर्माण करण्यांत आली आहे. तात्पर्य, गंगाजळी हुंडणावळीचा भाव उतरला असतां तो पूर्वपदावर आणण्यास्तव आहे. हुंडणावळीचा भाव चढला असतां तो खाली उतरविण्याकरितां नाहीं. कारण चांदीचा भाव कधी काळी चढेल हे कोणाच्या स्वप्नीही नव्हते व तो १९१७ साली जसा चढला तसा चढणे ही तर अशक्य कोटींतली गोष्ट होय, असेंच ही गंगाजळी ठेव निर्माण करतांना प्रत्येकास वाटत होतें.

 वास्तविक पाहिले असतां ह्या सरकारच्या म्हणण्यांत फारसा अर्थ आहे असे आम्हांस वाटत नाहीं. एक रुपयाचा १६ पेन्स असलेला दर १७ पेन्स करणे किंवा २४ पेन्स करणे ह्यापासून काय नुकसान आहे त्याचे पुढे विवेचन येणार आहे; त्यामुळे सध्यां ह्या मुद्यावर आम्ही फारसें लिहूं इच्छित नाहीं. पण एवढेच येथें सांगणे इष्ट आहे कीं, एखादी गोष्ट एका वेळी विवक्षित कारणाकरितां निर्माण करण्यांत आली असली तरी प्रसंग पडल्यास ती अन्य कारणाकरितां उपयोगांत आणूंच नये असे थोडेंच आहे. गंगाजळी ठेव प्रथम हुंडणावळीचा भाव उतरला असतो पुनः स्थिर करण्याकरितां निर्माण झाली असेल; पण १९१७ सालसारखा प्रसंग आला असतांना ह्या गंगाजळीचा उपयोग करण्यांत आला असता तर येथील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले नसतें.

 (७१) बॅबिंगटनस्मिथ कमेटीच्या सूचना: – हिंदुस्थान सरकार, जसजशी चांदीची किंमत वाहूं लागली तसतसा हुंडणावळीचा दरही वाढवूं लागलें. आतां प्रश्न असा आला की, हा दर कितीपर्यंत वाढवावयाचा, कीं तेथेंच 'खुंटीला टांगून' ठेवावयाचा ! ह्या प्रश्नांचा कायमचा निकाल लावण्याकरितां एक बॅबॅिग्टनस्मिथ कमेटी नेमण्यांत आली.

 ह्या कमेटीने असे ठरविले की, एका रुपयास १६ पेन्स हा भाव जर कायम ठेवला तर रुपये आटवून लोक चांदी परदेशी पाठविणार. तेव्हां २४ पेन्सांत जर हा भाव चढविला तर लोकांना चांदी अटविण्याचा मोह पडणार नाहीं. हल्लीच हुंडणावळीचा भाव चढला असल्यामुळे बाजारांत जिनसांचे भाव