पान:भरतपुरचा वेढा.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गाड्यांत २५० मण दारू होती, तो गाडा अकस्मात् मोडल्यामुळे घर्षणानें अग्नि उत्पन्न होऊन दारू जळू लागली व मोठा धडाका उडाला ! या धडाक्याने कित्येक शिपाई व मजूर जागच्याजागी भाजून मेले व पुष्कळ सामान निरुपयोगी झाले. इंग्रजांनी तोफा व दारूगोळा ठेवण्याकरितां जो बुरूज उभारिला होता, त्याचा जाटांनी अगदी उच्छेद करून टाकिला. जाटांच्या एका सुरुंगाला इंग्रजांनी आग लाविल्यामुळे बरेच जाट कामी आले. ता० ११ जानेवारी रोजी सकाळी, ८ वाजल्यापासून ९ वाजतपर्यंत खंदकावर एक लढाई झाली. जाट लोकांनी इंग्रजी तोफखान्याच्या नजीकचे एक बळकट ठिकाण आपल्या ताब्यात घेतले होते, त्यांस तेथून हांकून लावण्याकरितां कांहीं गोरे शिपाई पाठविण्यात आले होते, परंतु बराच वेळ लढाई झाल्यावर, जाटांपुढे इंग्रजांचे कांहीं तेज न पडल्यामुळे त्यांस मागें पाय काढावा लागला. या युद्धांत इंग्रजी योद्धा कर्नल फेथफुल यास भयंकर जखमा झाल्या. दुसरे दिवशीं, जाट सैन्यांत भेद उत्पन्न करण्याकरितां कांहीं गोरे शिपाई पाठविण्यांत आले होते, परंतु त्यांस येतांना पाहून जाटांनी आपल्या तोफा चालू केल्यामुळे पुनः लढाई सुरू झाली. या लढाईत, इंग्रजी सैन्याने आपल्या संगिनींचा उपयोग करून शेंकडों जाटांचा विध्वंस केला. या दिवशी, दुर्जनसाल पळणार आहे, अशीही अफवा उठली होती; इंग्रजही सावध होते, परंतु ती अफवा शेवटी अफवाच ठरली! पुढे ता० १३ पासून ता० १६ पर्यंत, दोन्ही पक्षांच्या तोफा व बंदुका झडतच होत्या. या वेळी, दोन्ही पक्ष अगदी सारखे होते. इंग्रजांस शहरांत घुसतां येत नव्हते व जाटांस त्यांस हांकून लावितां येत नव्हते. भर० ५