पान:भरतपुरचा वेढा.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५ १८ डिसेंबरपावेतों, या सैन्याच्या हालचालीसंबंधाने महत्वाचे असें कांहींच घडले नाही. भरतपुरांतील जाट सैन्याने, आपल्याकडून होण्यासारखी होती तेवढी तटाची मजबुदी करून ठेविली होती. ही मजबुदी करण्याचे काम चालू असतां, इंग्रजांनी एकदां दुर्गभेद करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु, जाटांनी तटावरून तोफांचा भयंकर मारा सुरू केल्यामुळे, तो सिद्धीस गेला नाही. या प्रयत्नांत इंग्रजांचे ४०-५० लोक मात्र निरर्थक प्राणास मुकले. आणखी एके दिवशी जाटांनी तटाचे बाहेर पडून इंग्रजांवर हल्ला केला होता, परंतु इंग्रजांच्या कांहीं गायी व अॅशी हांकून नेण्यापलीकडे त्यांच्या हातून विशेष कांहीं झाले नाही. ता० १९ डिसेंबर रोजी इंग्रजी सैन्याच्या युद्धसामुग्रीवर भरतपुरकरांनी एक जोराचा हल्ला केला होता. परंतु इंग्रजांकडील एका जमादाराने मोठ्या शौर्याने लढून तिचे रक्षण केले. या त्याच्या बहादुरीबद्दल लॉर्ड कोंबरमीर याने त्याची फार प्रशंसा केली. ता० २१ रोजी, जाटांनी तटावरून इंग्रजी सैन्यावर पुनः तोफा डागल्या होत्या व इंग्रजांकडूनही उलट तोफांचा मारा करण्यांत आला होता. या युद्धांत ५० जाट लोक प्राणास मुकले. याच दिवशी लॉर्ड कोंबरमीर याने दुर्जनसालास लिहून कळविले की, किल्लयांतील स्त्रिया व मुलें यांस २४ तासांचे आंत बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवा. ही मुदत संपतांच आमी शहरावर मारा करणार आहों. या पत्रास दुर्जनसालानें कांहींच उत्तर दिले नाही. ता० २४ डिसेंबरपासून, तटावर तोफांचे गोळे फेंकण्यास इंग्रजांनी सुरुवात केली. या दिवशी, इंग्रजी तोफांचे गोळे भरतपुरच्या तटावर येऊन धडाधड आपटत होते. भरतपुरकरांचा